इगतपुरी तालुक्यात निर्माण होतेय भयमुक्त वातावरण
इगतपुरीनामा न्यूज, दि. २८
इगतपुरी तालुक्यातील बिबट्या आणि वन्य प्राण्यांबाबत इगतपुरी तालुक्याचे वन खाते योग्य ते काम करीत आहे. संपूर्ण पथकाच्या समन्वयाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी सूक्ष्म नियोजन केले असून नागरिकांनी विनाकारण बिबट्याच्या वास्तव्य असणाऱ्या भागात जाऊ नये. रात्रीच्या वेळी विनाकारण जंगली भागात आणि पिंजरे लावलेल्या भागात फिरणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यासह बिबट्या किंवा वन्य प्राण्यांबाबत सोशल मीडियावर कोणतेही संबंध नसलेले व्हायरल व्हिडिओ, फोटो, अशा प्रकारे अन्य माध्यमातून कोणतीही अफवा पसरवू नये. अशा प्रकारे अफवा पसरवून नागरिकांमध्ये भीती निर्माण केल्यास अशा व्यक्तींवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी वन परिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव, पोपट डांगे, शैलेंद्र झुटे, दत्तू ढोन्नर उपस्थित होते. लावलेल्या पिंजऱ्यांमध्ये छेडछाड, भक्ष्याची चोरी, संरक्षित प्राण्यांना त्रास देणे आदी प्रकार झाल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही. इगतपुरी तालुक्यातील नागरिकांच्या सोबत वन विभाग असून भयमुक्त वातावरण निर्माण होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी लोकांना आवाहन केले आहे की, इगतपुरी तालुक्यातील बिबटे नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांना चांगले यश मिळत आहे. वन अधिकारी आणि कर्मचारी यासाठी रात्रंदिवस कार्यरत करण्यात आलेले आहेत. जागोजागी लावलेल्या पिंजऱ्यांच्या परीसरात काही नागरिक विनाकारण जात असल्याने वन खात्याच्या कामात बाधा निर्माण होत आहे. पिंजऱ्यांमध्ये छेडछाड आणि त्यात ठेवलेले भक्ष्य चोरी सुद्धा होत आहेत. यामुळे बिबटे अधिक हिंस्त्र होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर कोणीही नागरिकांनी बिबट्या असलेला भाग, पिंजऱ्यांचा परिसर, निर्जन जंगली भाग यामध्ये विनाकारण प्रवेश करू नये. वन्य प्राण्यांना कोणत्याही परीस्थितीत डिवचवू नये. असे केल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करून कारवाई केली जाईल.
काही दिवसांपासून सोशल मीडियावर बिबट्यांबाबत खोटे आणि संबंध नसलेले व्हिडिओ आणि फोटो प्रसारित होण्याचे प्रमाण वाढून अफवा पसरवण्यात येत आहेत. यामुळे नागरिक दहशत आणि भीतीमध्ये पडत आहेत. अशा अफवा पसरवणाऱ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे श्री. बिरारीस म्हणाले. कोणत्याही घटनेबाबत आपल्या भागातील वन अधिकारी, कर्मचारी अथवा तालुका कार्यालयाशी संपर्क साधून माहिती देऊन सहकार्य करावे असे ते शेवटी म्हणाले.