इगतपुरीनामा न्यूज ता. १७ : शहरात मोलमजुरी करून उपजीविका करणारे एका निराधार कुटुंब.. मोलमजुरी करून कशीबशी पोटाची खळगी भरत दिवस काढणे सुरू होते.. अशातच या कुटुंबातील एका सदस्याचे निधन झाले.. अगदी अंत्यसंस्कार करायलाही कुणाचा आधार नाही.. अशावेळी त्या कुटुंबाचा आधार झाले जनसेवा प्रतिष्ठान..!
इगतपुरी शहरातील डम्पिंग ग्राउंड जवळ झोपडपट्टीत राहणाऱ्या मीराबाई जाधव पोटाची खळगी भरण्यासाठी हरसुल येथून इगतपुरीत आल्या होत्या. सोबत फक्त त्यांचे वृद्ध वडील रामचंद्र जाधव.. मोलमजुरी करून, प्रसंगी भंगार जमा करून त्या स्वतःचे आणि वडिलांचे पोट भरत होत्या. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या वृद्ध वडिलांचे निधन झाले. इगतपुरी शहरात कुणीही नातेवाईक नाहीत, अंत्यसंस्कारासाठी पदरी दमडी सुद्धा नाही. अशा परिस्थितीत वडिलांचे अंत्यसंस्कार कसे करणार हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. या घटनेबद्दल लाला पवार यांनी जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर यांना माहिती दिली. फलटणकर यांनी स्वतः पुढाकार घेऊन सागर परदेशी, नगर परिषदेचे कर्मचारी जितू बोरीचा यांच्या मदतीने मिराबाई जाधव यांचे वडील रामचंद्र जाधव यांचे अंत्यसंस्कार केले. माणुसकी जिवंत आहे याचे उत्तम उदाहरण या पेक्षा वेगळे असू शकत नाही. या कामगिरीबद्दल जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर यांच्यासह अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेणार्या सर्वांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. याकामी इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्वरूपा देवरे यांची मार्गदर्शन लाभल्याचे फलटणकर यांनी इगतपुरीनामाशी बोलताना सांगितले.