इगतपुरीनामा न्यूज, दि. १०
केंद्र सरकारने केलेल्या कायद्यामुळे देशातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. ह्यातच शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचे कारस्थान करण्यात आल्याची संतापजनक घटना घडवण्यात आली. तरीही त्याची केंद्र सरकारने दखल न घेता अद्यापही आरोपी मोकाट आहेत. म्हणून शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी इगतपुरी तालुका महाविकास आघाडीतर्फे इगतपुरी तालुका बंद ठेवण्यात येणार आहे. घोटी येथे आज दुपारी प्रमुख पदाधिकाऱ्यांची व्यापाऱ्यांसह बैठक संपन्न झाली. यामध्ये सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी महाराष्ट्र बंदमध्ये सहभाग घेण्याचे निश्चित करण्यात आले. उद्या संपूर्ण इगतपुरी तालुक्यातील बाजारपेठा, घोटी आणि इगतपुरी शहर, बाजार समिती आदी कडेकोट बंद राहणार असल्याचे ठरवण्यात आले.
घोटी ग्रामपालिका कार्यालयात संपन्न झालेल्या बैठकीवेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती पाटील जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख भगवान आडोळे, कुलदीप चौधरी, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, विष्णू चव्हाण, इंदिरा काँग्रेसचे प्रदेश नेते भास्कर गुंजाळ, तालुकाध्यक्ष रामदास धांडे, समता परिषद तालुकाध्यक्ष शिवा काळे, नंदू भागडे, घोटी ग्रामपालिकेचे पदाधिकारी भरत आरोटे, रामदास भोर, श्रीकांत काळे यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.