सोमवारी जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाचा आरोग्य कर्मचारी संघटनेचा इशारा
इगतपुरीनामा न्यूज, दि. १८
कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाच्या वेळी सिन्नर तालुक्यातील पास्ते गावात जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण झालेली आहे. ही घटना अतिशय निंदनीय असून नाशिक जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करणारे कृत्य समाजकंटकांनी केले आहे. ह्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटना आक्रमक झाली आहे. मारहाण करून राष्ट्रीय कामात अडथळा आणणाऱ्या संबंधित समाजकंटकांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करावा. संशयित आरोपींना ३५३ कलमान्वये तातडीने अटक करावी. कोरोना प्रतिबंधक लसीकरण सत्राला नियमित पोलीस संरक्षण द्यावे ह्या मागण्या संघटनेने केल्या आहेत. या मागण्यांसह पोलीस संरक्षण मिळत नाही तोपर्यंत लसीकरण सत्र बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. पास्ते येथील निंदनीय घटनेच्या निषेधार्थ सोमवारी २० सप्टेंबरला नाशिक जिल्हा परिषद कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेचे राज्य संघटक बाळासाहेब ठाकरे यांनी कळवले आहे. यावेळी सर्व कर्मचारी संघटना सहभागी होऊन निषेध आंदोलन करणार आहेत.
आज नाशिक येथे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची विशेष सभा संपन्न झाली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आरोग्य कर्मचारी कोरोना सारख्या जीवघेण्या साथीचा उद्रेक थांबवण्यासाठी काम करीत आहेत. आरोग्य कर्मचारी जिवाच्या आकांताने गावपातळीवर लसीकरण सत्र आयोजित करून मोठ्या संख्येने सेवा देत आहेत. तरीही पास्ते येथील गैरप्रकार समाजकंटकांकडून झाला आहे. असे गैरप्रकार घडल्याने कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण होत असून ह्यावर कठोर उपाययोजना करण्याची मागणी सर्व आरोग्य कर्मचारी संवर्गीय संघटनांच्या वतीने नाशिक जिल्हाध्यक्ष विजय सोपे यांनी केली. संबंधित पोलीस ठाण्यात संशयितांवर दाखल केलेला गुन्हा मोघम स्वरूपाचा असून संबंधितांना पाठीशी घालणारा आहे असा सूर बैठकीत व्यक्त करण्यात आला. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मधुकर आढाव, राज्य कार्याध्यक्ष राजेंद्र चव्हाण, बाळासाहेब चौधरी, विवेक विसपुते, प्रवीण पाटील, तवर, राजेंद्र वाघ, एकनाथ वाणी, अमोल बागुल, संजय चव्हाण, किशोर अहिरे, दत्ता देशमुख, हितेश घरटे, बाळासाहेब चौधरी, दिनेश आहिरे, प्रशांत केळकर आदी पदाधिकारी बैठकीत उपस्थित होते. सुभाष कंकरेज यांनी सूत्रसंचालन तर सिद्धार्थ मोरे यांनी आभार मानले.
जीवघेण्या आजाराचा सामना करतांना लढाऊ सैनिकांसारखे काम आमचे आरोग्य कर्मचारी करीत आहेत. अनेकांना यामुळे जीव सुद्धा गमवावा लागला. अशा परिस्थितीत आरोग्य कर्मचारी भीतीच्या छायेत असतांना त्यांना मारहाण झाल्याची घटना राष्ट्रीय कर्तव्यात बाधा आणणारी आहे. ह्या निषेधार्थ संघटनेच्या वतीने बैठकीत निषेध व्यक्त करण्यात आला. संबंधितांवर कलम ३५३ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करावे. लसीकरणाला पोलीस संरक्षण द्यावे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत लसीकरण सत्र बंद ठेवण्यात येत आहे.
- विजय सोपे, जिल्हाध्यक्ष