वाल्मिक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १५
इगतपुरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्य भात पिकांच्या नुकसानीचे सबंधित अधिकारी व तलाठी यांच्या मार्फत पंचनामे केले. मात्र पिकविमा कंपनीकडुन नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. कोविड महामारीने त्रस्त व हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना संबंधित अधिकारी स्तरावर पिकविमा कंपनीकडुन त्वरीत भरपाई मिळावी यासाठी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ उच्च न्यायालयातही दाद मागणार होते. माजी आमदार मेंगाळ यांचा सातत्याने सुरू असलेल्या पाठपुराव्याने कृषिमंत्री दादासाहेब साहेब भुसे यांनी बैठक घेऊन पीक विम्याचा प्रश्न मार्गी लावला आहे.
सततच्या अस्मानी संकटाने शेतकरी बेजार झाले असून पीक विमे भरले असताना देखील शेतकरी अजूनही नुकसान भरपाईपासुन वंचितच आहे. विशेष म्हणजे बँकेकडून ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा पावती सुद्धा चुकीचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी किती पीकविमा भरला आहे ते लक्षात येत नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेल्या पावत्या घोटी येथे जमा कराव्यात असे आवाहन माजी आमदार मेंगाळ यांनी केले होते. शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत पावत्या जमा केल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर कृषीमंत्री दादा भुसे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना दिल्याने लवकरच हा प्रश्न मार्गी लागणार आहे. यावेळी संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, उपतालुकाप्रमुख कुलदीप चौधरी, रामदास भोर, संजय आरोटे, हिरामण कडू, दीपक कोंबडे आदी उपस्थित होते.