सुनिल बोडके, इगतपुरी नामा न्यूज, दि. ११
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकीत कर्जदारांना जप्तीच्या नोटिसा आल्या आहेत. गेल्या पाच-सात वर्षापासून हवामान बदल, अतिवृष्टी, ओला कोरडा दुष्काळ यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासह शेतमालाचा उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. अनेकांनी सरकार कर्जमाफी करणार अशा आशेने कर्ज भरण्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेल्या रकमेपेक्षा अधिक व्याज झाल्याने शेतकऱ्यांच्या जमिनी विकूनही शेतकरी कर्ज फेडू शकत नाही. वसुलीच्या धास्तीने शेतकरी त्रस्त झाले आहे. कर्जावरील व्याज माफी द्यावी, मुद्दल रकमेचे हप्ते करून वाढीव मुदत द्यावी, जप्तीची कारवाई थांबवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
गिरणारे येथील शिष्टमंडळाकडून बँकेचे मुख्य प्रशासक आरिफ शेख व मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. प्रशासकांसोबत पुंडलीकराव थेटे, किसान सभेचे कार्याध्यक्ष राजू देसले यांनी चर्चा केली. शेतकऱ्यांना योग्य ते सहकार्य करण्यात येईल. मात्र बँकेलाही शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे बँकेच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा बँकेने इतर बँकांच्या धर्तीवर ओटीएस योजना, संपूर्ण व्याज माफी, इतर आकारलेल्या दंडाची माफी द्यावी. कर्जाचे हप्ते करून द्यावे. यासाठी त्र्यंबकेश्वरसह जिल्ह्यातील शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री, कृषीमंत्री आदींच्या भेटी घेऊ. त्यांच्याकडे शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणार असून अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना त्रास होणार नाही यासाठी भूमिका मांडू.
- समाधान बोडके पाटील, शिवसेना नेते