सलून असोसिएशनची वावी, पाथरे येथे नवीनच साकारलेल्या “श्री संत सेना महाराज” मंदिरास भेट

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६

धार्मितेचा वारसा असलेल्या सिन्नर तालुक्यातील वावी व पाथरे येथे नाभिक बांधवानी एकत्र येत समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेना महाराज यांचे भव्य दिव्य मंदिर उभारले आहे. श्री संत सेना महाराज पुण्यतिथीचे औचित्य साधीत महाराष्ट्र राज्य सलून असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ह्या मंदिराला भेट दिली. यावेळी सर्व टीमच्या वतीने मंदिरात यथोचित पूजन करून आरती करण्यात आली. 

संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित पांडुरंग महाराज गिरी वावीकर यांचे किर्तन झाले. मंदिराचे कलशारोहण महान तपोनिधी सद्गुरु जनार्दन स्वामींचे शिष्य भोलेगिरी महाराज यांच्या हस्ते पार पडले. संत सेना महाराज मंदिर कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा या तीन दिवसीय कार्यक्रमात प्रवचन, हरिपाठ, संगीत भजन, किर्तन असे भरगच्च कार्यक्रम झाले. ह.भ.प. शिंदे गुरूजी यांचे प्रवचन, श्री संत ज्ञानेश्वर भजनी मंडळाचा कार्यक्रम, महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य संगीतरत्न ह.भ.प. भगूरे गुरुजी, ह.भ.प. प्रकाश महाराज कातकाडे, मृदूंगमणी ह.भ.प. भरत महाराज पठाडे, तालमणी ह.भ.प. दिनेश महाराज मोजाड यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम झाला. हे मंदिर सखाराम बापू जाधव यांनी स्वखर्चातून बांधले आहे.

याप्रसंगी सलून असोसिएशनचे नाशिक जिल्हाध्यक्ष एकनाथ शिंदे, नाभिक एकता महासंघ जिल्हाध्यक्ष रमेश बिडवे, इगतपुरी सलून असोसिएशनचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र कोरडे, नाभिक एकता महासंघाचे सिन्नर तालुकाध्यक्ष राजेंद्र बिडवे, ॲड. सुनिल कोरडे, घोटी ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ कडवे, जिल्हा संघटक अशोकराव सूर्यवंशी, सचिव किरण कडवे, वैभव कोरडे, प्रसिद्धी प्रमुख गणेश रायकर, पत्रकार लक्ष्मण सोनवणे आदी बांधव उपस्थित होते.

नाभिक समाजाला रोजगार मिळवून देण्यासाठी शिर्डीत बैठक

नाभिक समाजाला रोजगार मिळवून देण्यासाठी शिर्डीत बैठक झाली. नाभिक एकता महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनोज वाघ यांची भेट घेउन समाजाच्या हितासाठी बैठक घेण्यात आली. होतकरू नाभिक बांधवांसाठी नवीन व्यवसाय तसेच महिलांसाठी, पुरुषासाठी बचत गटाची निर्मिती, सलून कारागीर करिता जीवन विमा योजना व सलून कारागिरांसाठी आधुनिक पद्धतीचे प्रशिक्षण देण्याबाबत चर्चा करण्यात आली. नाभिक समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जिल्हाध्यक्ष एकनाथ शिंदे म्हणाले.

नाभिक समाज एकत्र येऊन संत सेना महाराज मंदिराची निर्मिती करीत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. समाज हितासाठी एकजुटीने काम केल्यास त्याचे फळ नक्कीच मिळेल. समाजातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सलून असोसिएशन कटिबद्ध आहे. समाजाच्या हितासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.
- ॲड. सुनील कोरडे, कायदेशीर सल्लागार महाराष्ट्र राज्य सलून असोसिएशन

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!