इगतपुरीनामा न्यूज, दि. २
आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या परिस्थितीमध्ये एकाग्रता व आरोग्यासाठी योगाची आवश्यकता आहे. महाविद्यालयीन युवकांनी योगाच्या माध्यमातून आपले आरोग्य जपावे. व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी योग शिक्षणाची खरी गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी केले.
इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात १० दिवसांच्या ऑनलाईन बेसिक योग प्रमाणपत्र कोर्सच्या उदघाटन प्रसंगी रवींद्र नाईक बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड हे होते. याप्रसंगी सिडको महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. मिनाक्षी गवळी, उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, कोर्सचे समन्वयक प्रा. एच. आर. वसावे, प्रा. डी. के.भेरे, प्रा. जी. एस. लायरे, प्रा. ए. बी. धोंगडे उपस्थित होते.
श्री. नाईक आपल्या मनोगतात पुढे म्हणाले की, शासनाच्या माध्यमातून योगशिक्षणाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळते आहे. ही महत्त्वाची बाब म्हणावी लागेल. आदिवासी भागातील युवकांना या प्रमाणपत्र कोर्सचा उपयोग होईल. प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी महाविद्यालयात बेसिक योग प्रमाणपत्र कोर्स आयोजित करण्यामागील भूमिका विशद केली. योगाची आवश्यकता सर्वांनाच असून याचा प्रचार आणि प्रसारासाठी युवकांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय कोर्सच्या समन्वयक डॉ. मिनाक्षी गवळी यांनी केला. महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. एच. आर. वसावे यांनी प्रास्ताविक करून दहा दिवस चालणाऱ्या कोर्सची माहिती दिली. योगाचा इतिहास सांगून युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. डी. के. भेरे यांनी मानले.