इगतपुरीनामा न्यूज, दि. १८ :
इगतपुरी तालुक्यातील शेतकरी आणि दिव्यांग बांधव मोठ्या संकटातून जात आहेत. अस्मानी आणि सुलतानी संकटासह कोरोनामुले त्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. परिणामी थकलेले वीजबिल वसुलीसाठी कृषी पंपांची वीज जोडणी तात्काळ थांबवावी अशी मागणी इगतपुरीच्या प्रहार दिव्यांग संघटनेच्या शिष्टमंडळाने केली आहे. इगतपुरीच्या महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांना प्रहार अपंग क्रांती संस्था प्रणित प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोना संकटामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे इगतपुरी तालुक्यातील शेतकरी व दिव्यांगांची वीजबिल थकबाकी झालेली आहे. विजबील वसुली करण्याचे काम महावितरण कंपनीकडून सुरू असून वीज जोडणी तोडण्याचे काम केले जात आहे. यावर्षी शेतकरी आर्थिक संकटात असून अतिपावसामुळे भात शेती उद्धवस्त झालेली होती. कोरोनाच्या भीतीमुळे भात, बागायती पिकांना बाजारभाव सुद्धा मिळालेला नाही. त्यामुळे मातीमोल भावात बागायती पिके विकावी लागली. यामुळे शेतकरी आणि दिव्यांग बांधवांचे उदरनिर्वाहाचे साधन आधीच धोक्यात आहे. आर्थिक संकटाला तोंड देत असल्यामुळे इगतपुरी तालुक्यातील शेतकरी व दिव्यांग बांधवांना वीजबिल भरणे शक्य नाही. त्यामुळे शेतकरी आणि दिव्यांग बांधवांची विजजोडणी तात्काळ थांबवून दिलासा द्यावा असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मानकर, तालुकाध्यक्ष नितीन गव्हाणे, उपाध्यक्ष सोपान परदेशी, पूर्व तालुकाध्यक्ष विलास कानकट, निरंजन खातळे, मंगेश शिंदे, उत्तम दुभाषे, योगेश चव्हाण आदी दिव्यांग बांधव उपस्थित होते.
