१० वर्षापासून हजारो रुग्णांना प्राणदान देणारे घोटीचे “मातोश्री हॉस्पिटल” : रुग्णसेवेचा दहावा वर्धापनदिन म्हणजे रुग्णरुपी देवाचा आशीर्वादच : डॉ. चोरडिया

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – हजारो कुटुंबातील रोगग्रस्त लोकांना पुनर्जन्म मिळवून देण्यासाठी इगतपुरी तालुक्यात घोटी येथील अग्रगण्य रुग्णालय म्हणून मातोश्री हॉस्पिटलचे नाव नाशिक जिल्हाभर सुप्रसिद्ध आहे. एक माणूस वाचवला तर त्याच्या परिवाराला सुद्धा वाचवले असे मानले जाते. त्यानुसार मातोश्री हॉस्पिटलने हजारो कुटुंबात आपलं आगळेवेगळे स्थान भक्कम केले आहे. मुंबई, पुणे सोडून अन्य कुठेही न होणाऱ्या अत्यंत दुर्मिळ आणि दुर्धर आजाराच्या शस्त्रक्रिया ह्याच हॉस्पिटलने यशस्वी करून दाखवत वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गज माणसांकडून कौतुकाची थाप पटकावलेली आहे. आजपासून १० वर्षांपूर्वी मातोश्री हॉस्पिटल नावाचे लावलेले रोपटे महावृक्षाचे धारण करीत आहे. डॉ. जितेंद्र चोरडिया, डॉ. हेमलता चोरडिया यांनी आजच्या दिवशी मातोश्री हॉस्पिटलची स्थापना करण्याला तब्बल १० वर्ष पूर्ण झाली आहेत. एक दशकाचा रुग्णसेवेचा अखंडित प्रवास इगतपुरी तालुक्याला नवसंजीवनी मिळवून देणारा ठरला आहे. हॉस्पिटलच्या स्थापनेपूर्वी घोटी शहरातच छोट्याशा दवाखान्यात गोरगरीब नागरिकांना १२ वर्ष निरंतर सेवा देऊन मिळवलेला अनुभव आणि आशीर्वाद यामुळेच मातोश्री हॉस्पिटल आज आपला दहावा वर्धापनदिन मोठ्या अभिमानाने साजरा करीत आहे. “मातोश्री” म्हणजेच आई बनून विविध रुग्णांसाठी वरदान ठरणाऱ्या मातोश्री हॉस्पिटलमध्ये सध्या अनेक अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळत आहेत. येत्या काळात यामध्ये भर टाकून मुंबई पुण्यात मिळणाऱ्या महत्वपूर्ण आरोग्य सुविधा नागरिकांसाठी देण्याचे अभिवचन डॉ. जितेंद्र चोरडिया, डॉ. हेमलता चोरडिया यांनी आज दिले.

दशकभरामध्ये अति दुर्मिळ दुर्धर आणि अवघड असणाऱ्या ५० पेक्षा जास्त शस्त्रक्रिया, नियमित स्वरूपाच्या हजारो शस्त्रक्रिया, जीवनदायी आरोग्य योजना, रोगापासून बचावासाठी समुपदेशन आणि मार्गदर्शन यासह दैनंदिन स्वरूपात हजारो रुग्णांची सेवा मातोश्री हॉस्पिटलने करून दाखवलेली आहे. हॉस्पिटलच्या प्रामाणिक आणि पारदर्शक कारभारामुळे अनेक कुटुंबातील रोगग्रस्त कुटुंबप्रमुखांना मोलाचे प्राण पुन्हा परत मिळाले आहेत. ह्या सगळ्यांच्या मूल्यवान आशिर्वादामुळे मातोश्री हॉस्पिटलने तब्बल दहा वर्षाचा रुग्णसेवेचा अखंडित प्रेरणादायी प्रवास पूर्ण केला आहे. महामार्गापासून जवळ असल्याने होणाऱ्या छोट्या मोठ्या अपघातग्रस्त व्यक्तींना अत्यावश्यक उपचार देण्यासाठी ह्या हॉस्पिटलने मोलाचे कार्य केलेले दिसते. अतिदुर्गम डोंगराळ भागातील आदिवासी नागरिकांच्या गरिबीचा विचार करून त्यांच्यावर महागडे उपचार अत्यंत अल्प दरात किंवा मानवता स्वरूपात करण्यात आले आहेत. नाशिक जिल्हाभरात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामाने मातोश्री हॉस्पिटल सुप्रसिद्ध झालेले आहे. २४ तास अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांच्या सेवेला वाहून घेतात. आपुलकीने आणि आस्थेवाईकपणाने हॉस्पिटलचा कर्मचारी वर्ग रुग्णांसाठी उपयुक्त ठरतो. निरंतर आरोग्य सेवा आणि रुग्णसेवेचा हा वारसा दहा वर्ष पूर्ण करत आहे. येणाऱ्या काळात हृदयरोग, कर्करोग, सिटी स्कॅन, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी इत्यादी महत्वाच्या आरोग्य सुविधा लोकांच्या सेवेत रुजू होणार आहेत. मातोश्री हॉस्पिटल दहावा वर्धापनदिन अत्यानंदात साजरा करीत असून हजारो लोकांनी आम्हाला दिलेला आशिर्वाद आमच्यासाठी परमेश्वराने दिलेल्या वरदानासारखा आहे. आम्ही यापुढेही सेवेचा वारसा अखंडित, निरंतर कायम ठेवून रुग्णसेवा अधिकाधिक उत्तम करण्यासाठी वचनबद्ध आहोत अशी प्रतिक्रिया डॉ. जितेंद्र चोरडिया, डॉ. हेमलता चोरडिया यांनी दिली.

Similar Posts

error: Content is protected !!