ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, प्रशासनाच्या अनास्थेमुळे नागरिक तापाने फणफणले
इगतपुरीनामा न्यूज, दि. १९
इगतपुरी तालुक्यातील त्रिंगलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील पारदेवी येथील येथील एका उच्चभ्रु हॉटेलच्या शौचालयाचे आणि वापरायला अयोग्य पाणी पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत उतरले आहे. त्या पाण्यामुळे येथील कातकरी वस्तीतील आदिवासी कातकरी नागरिक तापाने फणफणले आहेत. ह्या वाडीत 10 कातकरी कुटुंब राहत असून अंदाजे 40 ते 50 लोकांचे आरोग्य चांगलेच धोक्यात आले आहे. त्रिंगलवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेविकेला याप्रश्नी कळवूनही त्यांनी दखल घेतली नसल्याने श्रमजीवी संघटना आक्रमक झाली आहे. इगतपुरीच्या गटविकास अधिकाऱ्यांना आज श्रमजीवी संघटनेने निवेदन दिले. संबंधित हॉटेलवर कारवाई करून शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी निवेदनात केली आहे. गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात कातकरी कुटुंबे ठिय्या आंदोलन करणार असल्याचे कळवण्यात आले आहे.
इगतपुरी तालुक्यातील त्रिंगलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील पारदेवी येथे १० कातकरी आदिवासी कुटुंबांची वाडी आहे. ह्या वाडीतील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीजवळ एक उच्चभ्रु हॉटेल आहे. ह्या हॉटेलमधील शौचालयाचे आणि अत्यंत घाणेरडे पाणी विहिरीत उतरले आहे. जनावरे सुद्धा तोंड लावणार नाही असे हे पाणी असून नाईलाजाने हे पाणी कातकरी नागरिकांना प्यावे लागत आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेविका यांना वारंवार सांगूनही कातकरी नागरिकांचे गाऱ्हाणे कोणीही ऐकायला तयार नाही. परिणामी ह्या वाडीमधील बहुतांश नागरिक तापाने फणफणले आहेत. याबाबत श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे यांना माहिती मिळताच त्यांनी भेट देऊन माहिती घेतली. संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क करून तातडीने उपाययोजना करण्याचे सुचवले. मात्र अद्याप कोणीही दखल घेतली नसल्याचे श्री. मधे यांनी सांगितले.
श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे, तालुकाध्यक्ष सीताराम गावंडा, तालुका सचिव सुनिल वाघ यांनी आज इगतपुरीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले. जाणीवपूर्वक तातडीने लक्ष घालून तात्काळ हॉटेल मालकावर कारवाई करावी. सर्व कातकरी कुटुंबाला शुद्ध पाणी द्यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. गुरुवारी दि. २० ऑगस्टला काहीही करून हे पाणी शुद्ध न केल्यास सर्व कातकरी कुटुंब इगतपुरी येथील गटविकास अधिकारी यांच्या दालनात शुद्ध पाण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनीही ह्याप्रकरणी लक्ष घालावे अशीही मागणी करण्यात आली आहे. प्रस्तुत प्रकरणी ग्रामसेविका श्रीमती शिंदे यांच्याकडून त्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी संपर्क साधला. मात्र त्या नॉट रीचेबल असल्याने संपर्क होऊ शकला नाही.
पारदेवी येथील उच्चभ्रू हॉटेलमधील गलिच्छ पाणी कातकरी माणसांच्या मुळावर बसले आहे. ह्या नागरिकांचे आरोग्य अत्यंत धोक्यात आले आहे. शुद्ध पाणी देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर असूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. ह्याबाबत प्रशासनाने युद्धपातळीवर कार्यवाही करावी अन्यथा गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करू.
- भगवान मधे, सरचिटणीस श्रमजीवी संघटना