
इगतपुरीनामा न्यूज – रेझिंग डे अर्थात पोलीस स्थापना दिवसानिमित्त इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले रक्तदान केले. पोलीस स्थापना दिवस आणि या दिवशी पोलिसांना ध्वज प्रदान करण्यात आल्याच्या निमित्ताने दरवर्षी जानेवारीचा पहिला आठवडा रेझिंग डे सप्ताह म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या रक्तदान शिबिर ह्या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत केले जात आहे. समता ब्लड सेंटरच्या साहाय्याने ह्या रक्तदान शिबिरात पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे, पोलीस उपनिरीक्षक सुनील बिराडे, पोलीस हवालदार प्रविण काकड, अदीप पवार, रामकृष्ण लहामटे आणि परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यामध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती आदींनी सर्व रक्तदात्यांचे कौतुक केले.