शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्थेची गोरखगडावर २६ वी दुर्गसंवर्धन मोहीम संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. १२
गोरखगड ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील देहरी गावाजवळचा किल्ला आहे. किल्ल्याचे नाव हे नाथ संप्रदायातील गोरखनाथ यांच्या नावावरुन गोरखगड असे ठेवलेले आहे.गोरखगड आणि मच्छिंद्रगड हे त्यांच्या सुळक्यामुळे गिर्यारोहकांसाठी ते नेहमीच एक आकर्षण ठरले आहेत. नाथ संप्रदायातील गोरक्षनाथांच्या साधनेचे हे ठिकाण, म्हणूनच याचे नाव ‘गोरखगड’असे पडले.  या गडाचा उपयोग केवळ आसपासच्या प्रदेशवर नजर ठेवण्यासाठी होत असे. पूर्वी नाणेघाट मार्गे जुन्नरला जातांना या गडाचा निवासस्थान म्हणून वापर करत असत. मर्यादित विस्तार असूनही मुबलक पाणी गडावर उपलब्ध आहे.
गोरखगडाच्या कातळात खोदलेल्या प्रवेशव्दारातून वर चढून गेल्यावर तीन पाण्याची टाकं लागतात. समोरची वाट पुन्हा थोडयाशा चढणीवर घेऊन जाते. पुढे पायर्‍यांच्या मदतीने थोडे खाली उतरल्यावर आपण गोरखगडाच्या सुळक्यात खोदलेल्या अतिविशाल गुहेसमोर येऊन पोहचतो. समोरच प्रांगणाखाली भयाण दरीत झुकलेले दोन चाफ्याचे डेरेदार वृक्ष आणि समोरच असणारा ‘मच्छिंद्रगड’ निसर्गाच्या भव्य अदाकारीचे असीम दर्शन घडवतो. गुहेच्या आजुबाजूला पाण्याची तीन टाकी आहेत. गोरखगडाच्या पठारावर एकूण चौदा पाण्याची टाके आहेत. पण त्यापैकी गुहे जवळील पाण्याच्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. ह्याच पाण्याच्या टाक्या शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्थेच्या मावळ्यांनी स्वच्छ केल्या. त्यात पडलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या बाहेर काढून स्वच्छता करण्यात आली. किल्ल्यावरील महादेवाच्या मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. जमा झालेला कचरा किल्ल्यावरील एका मोठ्या खड्ड्यात टाकून कचऱ्याची विल्हेवाट करण्यात आली. या मोहिमेमध्ये श्याम गव्हाणे, बाळासाहेब शिंदे, विजय दराणे, छोटू दराणे, पालघर शाखेचे अमित पाटील, धीरज पाटील, संतोष इंगळे, नयन भोईर, मयुर मडवी, आशिष सावंत, किरण ठाकरे, दर्शन पाटील, विशाल जाधव, चेतन पाटील, प्रतीक जाधव, प्रशांत भोईर, संकेत पाटील, रमेश धस, तुषार हिंदुराव आदी शिवदुर्ग संवर्धन भ्रमंतीचे सदस्य सहभागी झाले होते.

शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्थेच्या २६ व्या दुर्गसंवर्धन मोहीमत सहभागी कार्यकर्ते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!