इगतपुरी आदिवासी क्रीडा प्रबोधिनी : आमदार खोसकर यांच्या पाठपुराव्याने क्रीडा प्रबोधिनीसाठी ६० कोटी मंजूर

इगतपुरीनामा न्यूज, दि. ११
इगतपुरी तालुक्यातील पिंप्रीसदो येथील ४७ एकर जागेत राज्यातील पहिली आदिवासी क्रीडा प्रबोधिनी साकारली जाणार होती. अनुसुचित जमातीच्या मुलांमध्ये जन्मतःच असलेल्या विविध क्षमता, त्यांचे क्रीडा नैपुण्य काही ठराविक खेळाकरिता उपयोगी ठरू शकतात. त्यामुळे अनुसुचित जमातीच्या मुलांना क्रीडा विषयक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यास ही मुले अनेक खेळामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करू शकतात असा विश्वास शासनाला असल्यामुळे आदिवासी क्रीडा प्रबोधिनीची निर्मिती करण्यात येणार असल्याचे वृत्त होते.  मात्र आदिवासी विकास विभाग व क्रीडा संचालनायातील समन्वयाच्या अभावामुळे या क्रीडा प्रबोधिनीचे घोंगडे भिजत पडले होते. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिवासी विकास मंत्री ना. के. सी. पाडवी, विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रयत्नातून इगतपुरीच्या क्रीडा प्रबोधिनीसाठी भरीव निधी आमदार हिरामण खोसकर यांनी मंजूर केला आहे. खोसकर यांनी क्रीडा प्रबोधनीसाठी ६० कोटी रुपये मंजूर केले आहे.
आजपर्यंत हा प्रश्न अनुत्तरीतच होता. अनुसुचित जमातीच्या मुलांना क्रीडा विषयक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने या क्रीडा प्रबोधिनीचे बांधकाम तातडीने सुरु करण्याची मागणी देखील त्यावेळी करण्यात आली होती. मात्र अजून पर्यंत क्रीडा प्रबोधनी कुठं आहे हे शोधण्याची वेळ आली होती. यासाठी आमदार हिरामण खोसकर यांनी हा प्रश्न मार्गी लावल्याने तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे. या क्रीडा प्रबोधिनीसाठी इगतपुरी तालुक्यात जलसंपदा विभागाची पिंप्रीसदो येथील जमीन आदिवासी विकास विभागास हस्तांतरीत करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून इमारत बांधकामाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू होते. आदिवासी युवकांमध्ये प्रचंड उर्जा व काटकता असते, धावणे, पोहणे, लांब, उंच उडी आणि नेमबाजीसह विविध क्रीडाप्रकारांचे कौशल्य त्यांच्यात नैसर्गिकरीत्या असते. जंगलातील चित्याच्या गतीने धावणारे आदिवासी युवकांचे पाय, एकलव्याप्रमाणे अचूक नेम साधत आवाज टिपणारी तीक्ष्ण नजर आणि वेगवान पाण्याचा प्रवाह कापत पोहणाऱ्या आदिवासी मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आदिवासी विकास विभागाने पुढाकार घेतला. तर इगतपुरी तालुक्यात कविता राऊत सारखे धावपटू घडतील हाच मुद्दा लक्षात घेता आमदार हिरामण खोसकर यांनी महाविकास आघाडीच्या सर्व मंत्र्याकडे पाठपुरवा करत क्रीडा प्रबोधनीचा मार्ग मोकळा करुन भरीव असा निधी प्राप्त केला आहे. क्रीडा प्रबोधिनी गेल्या काही वर्षांपूर्वीच मंजूर होती मात्र योग्य वेळी पाठपुरावा न झाल्यामुळे तिचा प्रश्न पडून होता. आमदार हिरामण खोसकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून इगतपुरी तालुक्यातील क्रीडा प्रबोधिनीसाठी ६० कोटीचा निधी मंजूर करुन घेतला.
                              

आमदार हिरामण खोसकर