इगतपुरीनामा न्यूज, दि. ११
इगतपुरी तालुक्यातील बेलगाव तऱ्हाळे येथे शासनाच्या मुंबई नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत शेतकरी आणि प्रकल्पाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. ही बुलेट ट्रेन ( हाय स्पीड ट्रेन ) इगतपुरी तालुक्यातील गावातील जमिनीतून जात आहे. त्यांनी आज या प्रकरणी शेतकरी बांधवांना सविस्तर माहिती दिली. या मार्गातील शेतकरी बंधूंचे यामध्ये काय नुकसान होते, किती शेती जात आहे ? याची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. शेतकरी बांधवांनी बुलेट ट्रेन बाबतचा फॉर्म भरून संमती द्यावी अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांनी त्या प्रस्तावाला नकार दिला. आधी तुम्ही जाणाऱ्या मार्गाचे क्षेत्र, गट नंबर, शेत मालकाचे नाव हे सर्व घोषित करावे. शेतकरी वर्गाची समृद्धी महामार्गाच्या संपादनावेळी फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे एक प्रकल्प असताना प्रत्येक गावाला वेगळे दर दिले गेले. अनेकांची फसवणूक करून तत्कालीन सरकार, प्रशासन, दलाल यांनी लोकांना खोटे बोलून फसवले. पूर्ण शेती बागायती लावणे, इतर तालुक्यातील अनेक लोकांना जास्त भाव दिले. परस्पर कुठली तरी समिती शेतकरी वर्गास चर्चा न करता दर ठरवून मोकळे झाले. शेतजमीन मालकाला विचारात न घेता बळजबरीने दर लादून खरेदी केली. तुम्ही एकदम सर्व पारदर्शक सांगावे अशी स्पष्ट भूमिका उपस्थित शेतकऱ्यांनी घेतली.
यासह शेतकऱ्यांनी संतप्त भूमिका व्यक्त केली. तालुक्यातील शेती विविध प्रकारच्या प्रकल्पासाठी जातेय. शेतकरी उध्वस्त होतोय. शासनाने प्रकल्प कुठून जातोय ? कोण शेतकरी आहे ? यासंदर्भात गावातील लोकांना माहिती द्यावी. विश्वासात न घेता होणाऱ्या एकतर्फी कारभाराला लोकांचा विरोध राहील असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. यावेळी बेलगाव तऱ्हाळे येथे मुंबई नागपूर हाय स्पीड रेल्वे प्रकल्प मुंबईचे अधिकारी शाम चौगुले, गणेश भोईर, रमेश शेलार आदींसह शेतकरी प्रतिनिधी इगतपुरी पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, शशिकांत आव्हाड, निवृत्ती तुपे, ज्ञानेश्वर कडू , वसंत भोसले, सुखदेव आव्हाड, भरत वारुंगसे, गजीराम आव्हाड, अनिल सोनवणे, ग्रा,पं, सदस्य संतोष वारुंगसे, नारायण आव्हाड, जालिंदर आव्हाड, पांडुरंग सांगळे शेतकरी उपस्थित होते.
बेलगाव तऱ्हाळे येथील शेतकऱ्यांचा बुलेट ट्रेन प्रकल्पाला विरोध
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group