इगतपुरीनामा न्यूज, दि. ११
महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख जी. साईप्रकाश यांचे महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना, म. रा. वनमजूर, वनकर्मचारी व वनक्षेत्रीय कर्मचारी संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी राज्यातील क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या व सेवाविषयक समस्यांबाबत त्यांना निवेदन देण्यात आले. काही वर्षांपासून राज्यात विक्रमी वृक्ष लागवडीसह वन्यप्राणी, वनाधारित ग्रामीणांना रोजगार देणारे विविध उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आले आहेत. वनक्षेत्रात वन्यप्राणी संख्येत निरंतर वाढ होत असल्याचे राष्ट्रीय पातळीवरील विविध अहवालावरून दिसून आले आहे. या प्रकल्प कार्यात प्रत्यक्ष सहभागी वनरक्षक- वनपाल मात्र वेतन व सर्वच सेवासुविधेत इतर विभागांच्या तुलनेत खुप मागे आहेत. याबाबतच्या मागण्यांचे निवेदन आणि विविध प्रस्ताव शासनास सादर करण्यात आले असल्याचे साईप्रकाश म्हणाले.
पोलीस व महसुल विभागातील पद संरचनेनुसार समान न्यायतत्त्वावर वनरक्षक-वनपाल यांना वेतन श्रेणी व सेवासुविधा मिळणे, अतिरिक्त कर्तव्यभत्ता पोलीस विभागानुसार मिळावा, नक्षलप्रवण क्षेत्रात जिवाची जोखीम पत्करुन वनरक्षक व वनपाल दुर्गम व अतिदुर्गम क्षेत्रात वनसंरक्षणाचे कर्तव्य करीत असल्यामुळे पोलीस विभागाप्रमाणे वेतन भत्ते मिळावे, दुर्गम व अतिदुर्गम क्षेत्रात गस्तीसाठी मोटारसायकल पुरवठा, साप्ताहिक रजा, रजा कालावधीत वेतन, वनरक्षक-वनपालांचे सेवाविषयक लाभ मिळणे, महिला प्रवर्गातील वनरक्षक व वनपाल यांना कामाचे तास निर्धारीत करुन अतिसंवदेन क्षेत्रात जोखमीचे कामगिरी न देणेबाबत, महिलांना कामाचे ठिकाणी प्रसाधनगृहाची व्यवस्था
करणे, अतिसंवेदनशील वनक्षेत्रातील वनसंरक्षण, वन्यप्राणी संरक्षण, अतिक्रमणाचे गुन्हे दाखल करणाऱ्या वनरक्षक व वनपालावर मोठ्या प्रमाणावर होणारे प्राणघातक हल्ले याबाबत योग्य कार्यवाही करुन सुरक्षा पुरविण्यात यावी. वनसंरक्षणाच्या मापदंडानुसार गुन्हेनिहाय तपासाची जबाबदारी निश्चित करणे, प्रभावी वनसंरक्षण यंत्रणा राबविणे, शस्त्र व शस्त्रनितीत आवश्यक बदल करणे व प्रभावी करण्याबाबतच्या प्रलंबित मागण्या यावेळी निवेदनातून सादर करण्यात आल्या. यावेळी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील, संघटनेचे कार्याध्यक्ष माधव मानमोडे, नाशिकचे पदाधिकारी गोरक्ष जाधव, रवींद्र सोनार,प्रितेश सरोदे, तानाजी भुजबळ यांच्यासह विशाल मंत्रीवार, दादा खटूले, संजय माघाडे, रवींद्र बखाल, भारत मडावी आदी उपस्थित होते.