पिंपळगाव घाडगा येथील पांडवकालीन प्राचीन महादेव मंदिर

इगतपुरीनामा न्यूज, दि. ११
इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव घाडगा येथील प्राचीनकालीन महादेव मंदिर हे जागृत देवस्थान आहे. हे स्थान अनेक भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. लांबवरून येणारे अनेक शिवभक्त दर्शनाचा लाभ घेतात. महाशिवरात्री निमित्ताने सुद्धा दरवर्षी येथे दर्शनासाठी भाविक येतात. कोरोनामुळे यावर्षी येथे नियमांचे पालन होत असल्याने गर्दीवर परिणाम मात्र झालेला आहे.
घोटी- शिर्डी या राज्य महामार्गापासून दोन किलोमीटर अंतरावर हे शिवमंदिर सर्वांचेच लक्ष वेधुन घेते. या मंदिरात प्राचीनकालीन शिवलिंग तर शेजारी हनुमान मंदिर देखील आहे. प्रवेशद्वाराजवळ दगडी नंदीची मूर्ती भक्तांना प्रेरणा देणारी आहे. या गावातील अनेक आबाल वृद्ध आजही येथील पांडवकालीन मंदिराची परंपरा टिकून ठेवतांना दिसतात.
येथील शिव मंदिराची स्थापना पाच पांडवानी केली असल्याचे मानले जाते. मंदिराच्या आजुबाजुला पांडवांनी मोठ्या कुशलतेने कोरीव कामातुन शिवगण, बुद्धमूर्ती प्रवेशद्वाराजवळ गणेश मूर्ती व इतर नक्षीकामातुन दगडी मंदिर साकारले दिसते. नाशिक येथील प्रसिद्ध पांडवलेणी प्रमाणे येथेही तसेच नक्षीकाम केलेले आहेत. पिंपळगाव घाडगा येथील पांडवानी साकारलेले शिवमंदिर त्यांच्या सुंदर कुशलतेचे प्रतिक आहे. शासनाने या शिवमंदिरासाठी सुखसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात येथील नागरिकांची अपेक्षा आहे.
या जागृत शिवमंदिरात सरजुदास महाराज यांनी मंदिर व्यवस्था उत्तम केलेली आहे. दरम्यान येथून सर्वतीर्थ टाकेद जवळच्या अंतरावर असल्यामुळे सर्वतीर्थाकडे जाणारे भाविक आवर्जून या जागृत महादेव मंदिराचे दर्शन घेऊनच पुढे मार्गक्रमण करतात. या मंदिरात श्रावण महिन्यात हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. सह्याद्री पर्वत रांगेच्या कुशीत लपलेले हे शिवमंदिर शिर्डीकडे पायी जाणाऱ्या साईभक्तांचे निवासस्थान बनले आहे. पावसाळ्यात त्यांना मंदिराचा मोठा आधार मिळतो.

पिंपळगाव घाडगा येथील पांडवानी साकारलेल्या प्राचीन महादेव मंदिरातील नक्षीकाम