इगतपुरीनामा न्यूज, दि. २
विविध कारखाने आणि मोठी औद्योगिक वसाहत असणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील महत्वपूर्ण गोंदे दुमाला ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक आज पार पडली. उपसरपंच पदावर कचरू बाबुराव धोंगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामस्थांनी निवडीचे स्वागत केले आहे.
२०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत माजी सरपंच गणपत भाऊ जाधव यांच्या कुशल नेतृत्वाखाली विकास पॅनलने घसघशीत बहुमत मिळवले होते. सरपंचपद राखीव प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने ह्या जागेवर शरद सोनवणे यांनी निवड झाली होती. मात्र निवडून आलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामपंचायत कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रत्येकी १० महिन्यासाठी उपसरपंच पदासाठी सर्वानुमते रोटेशन ठरवण्यात आले. हे रोटेशन आतापर्यंत प्रत्येकाने निष्ठेने जपले आहे. त्यानुसार पहिल्या १२ महिन्यांसाठी सीताबाई नाठे, नंतरच्या १० महिन्यांसाठी परशराम नाठे यांनी उपसरपंच पदावर उत्तम कार्य केले.
ठरल्याप्रमाणे उपसरपंच पदाची जागा रिक्त झाल्याने आज माजी सरपंच गणपत भाऊ जाधव, धोंगडे ग्रुप यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक घेण्यात आली.गोंदे दुमाला येथील ग्रामपंचायत कार्यालयात लोकनियुक्त सरपंच शरद सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. ह्या पदासाठी कचरू बाबुराव धोंगडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. घोषणा होताच ग्रामस्थांनी गुलाल आणि फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.
रिक्त असलेल्या उपसरपंच पदाच्या निवडीकडे इगतपुरी तालुक्याचे लक्ष लागून होते. माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य गणपत जाधव, परशराम नाठे, कृष्णा सोनवणे, शोभा नाठे, लिलाबाई नाठे, शिवानंदबाबा बेंडकुळे, सविता नाठे, ग्रामविकास अधिकारी विजयराज जाधव, लिपिक सुनील नाठे, गणेश शेळके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
गोंदे दुमाला ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा अनुभव सदस्यांना येण्यासाठी आम्ही सर्वानुमते रोटेशन ठरवले आहे. त्याप्रमाणे आम्ही ह्याचे प्रामाणिकपणे पालन करतो. आज कचरू बाबुराव धोंगडे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. ग्रामविकासाला त्यांच्या अनुभवाचा नक्की फायदा मिळेल. धोंगडे ग्रुपचे आम्हाला साहाय्य लाभले.
- गणपत भाऊ जाधव, मार्गदर्शक तथा माजी सरपंच