डोक्याचा भुगा नको, संयमाने घ्यायला हवे..!

लेखन - पुरुषोत्तम आवारे पाटील
दै. अजिंक्य भारत, अकोला
संवाद - 9892162248

जगात अनंत स्वभाव असणार्‍या व्यक्ती सर्वत्र नांदत असतात. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आढळतात, याचा अनुभव आपणही कळत न कळत सातत्याने घेत असतो.नोकरी, व्यवसाय किंवा आणखी कोणत्या पेशात असणार्‍या व्यक्तींना आपण विविध कारणांनी भेटतो तेव्हा काही वेळाच्या संपर्कात आपल्याला त्याच्या स्वभावाचा अंदाज येतो. काही व्यक्ती अशा भेटतात की त्यांची भेट आयुष्यात पुन्हा कधी होऊच नये असे वाटते तर काही व्यक्तींना वारंवार भेटावे असे वाटते. असे का होते, खरंतर दोन्ही प्रकारच्या व्यक्तींना पूर्वी कधी भेटलेलो नसतो तरीही एकीचा तिटकारा अन दुसरीचा लोभ वाटत असतो.

काही व्यक्ती अशा भेटतात की त्यांच्याबद्दल काहीही वाटत नसते, ती व्यक्ती भेटली काय किंवा नाही भेटली, आपल्यावर त्याचे काहीही परिणाम होत नाहीत. अशा असंख्य अदखलपात्र व्यक्ती दररोज आपल्या आयुष्यात येत असतात, परंतु ज्यांच्या भेटण्याने आपल्यावर परिणाम होतात अशा व्यक्ती आपण कायम लक्षात ठेवत असतो. या व्यक्ती खरंतर खूप मोठ्या असतात, म्हणजे मानाने पैशाने अशातला भाग नाही. कधी कधी सामान्य माणूस, एखादा कामगार किंवा शेतकरीसुद्धा आपले अनुभवविश्व समृद्ध करून जातो. आपल्याला भेटणारा थोर साहित्यिक वा महान कलावंत असला पाहिजे अशातला भाग नाही.

ज्यांना जग महान वगैरे मानते अशा व्यक्ती त्यांच्या खासगी जीवनात फार विचित्र वागताना दिसतात, माणूस म्हणून ते प्रसंगी हलकटसुद्धा असू शकतात. काही व्यक्ती संबंध जगण्यात दुहेरी व्यक्तिमत्त्व घेऊन जगत असतात, बाहेरच्या जगाला त्यांचा दिसणारा चेहरा वेगळा असतो आणि घरातल्या जगात त्याचे रूप वेगळे असते. लोकांमध्ये निर्माण झालेली नकली प्रतिमा जगताना त्यांचे मूलरूप नेहमी उघडे पडते याचाही अनुभव कधीतरी आपल्याला आलेला असतो. मात्र कुणीतरी एकदाच भेटला म्हणून त्यावर कोणी फारसा विचार करीत बसत नाही. व्यक्ती कधी उथळ असतात तर कधी शांत संयमी असतात. उथळ लोकांना समाज सन्मान देत नाही, परंतु तोंडावर अपमान सुद्धा त्यांचा कुणी करीत नाही. उथळ लोक कामापेक्षा जास्त बडबड करण्याच्या नादात एकमेकांची काड्या करायला मागेपुढे बघत नसतात. काहींना असा वर्ग आवडत असतो. कुणाचे कुठे सध्या काय सुरू आहे हे ऐकायला अनेकांना आवडते. गॉसिप प्रत्येकाला आवडते मात्र टाइमपास म्हणून त्याकडे बघण्याचा हेतू असतो, अशा लोकांना कुणी गंभीरपणे घेताना दिसत नाही. शांत, संयमी आणि इतरांना ऐकून घेणार्‍या व्यक्ती लोकांना आवडत असतात.
    

सध्याच्या काळात इतरांचे गार्‍हाणे ऐकून घ्यायला कुणाला वेळ नसतो. अशावेळी आपले कुणीतरी ऐकून घेणारे आहे ही वार्ता मोठी समाधान देणारी असते. आपल्या सभोवताल कधीतरी कुणाचे काहीवेळ ऐकून घेण्याचा प्रयत्न करून बघा, तुम्हाला समाधानाची अनुभूती नक्कीच मिळेल. मोठ्या संख्येने लोक असे आहेत की ज्यांना तुमच्याकडून पैसा नको असतो फक्त थोडावेळ देऊन त्यांच्या भावना समजून घेण्याची गरज असते. या छोट्याशा गोष्टीसाठी सुद्धा अलीकडे समाजात कुणाला वेळ नाही ही वस्तुस्थिती आहे. डोक्याचा भुगा करणार्‍या घटना रोज समाजात आणि आपल्याही जीवनात घडत असतात, अशावेळी डोके शांत ठेवून संयम ऑन ठेवून पुढचे पाऊल टाकायला हवे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!