इगतपुरीनामा न्यूज, दि. २९
आमूलाग्र सामाजिक परिवर्तन ही काळाजी गरज बनली आहे असे प्रतिपादन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव माजी खासदार कॉ. सीताराम येचुरी यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कमिटीने आयोजित केलेल्या ‘ महाराष्ट्राचे दीपस्तंभ ‘ या ऑनलाईन व्याख्यानमालाचे समारोपाचे पुष्प गुंफताना केले आहे.
यावेळी माजी खासदार कॉ. येचुरी म्हणाले की, ‘ प्रबोधन आणि समाजवाद ‘ हा मोठा विषय आहे. तर्काच्या आधारावर विकास होत असतो. कोरोना काळात तर्काच्या आणि विज्ञानाच्या आधारावर निश्चित विजय मिळवता येईल. जगात कोरोना व मंदी असल्यामुळे कोट्यवधी श्रमिक जनता देशोधडीला लागत आहे, मात्र मूठभर बड्या उद्योगपतींचे नफे आणि संपत्ती अभूतपूर्व प्रमाणात वाढत आहे. कोरोना काळात कोट्यवधी कामगारांचा गेलेला रोजगार आणि गेले सहा महिने चाललेले अभूतपूर्व शेतकरी आंदोलन याकडे त्यांनी लक्ष वेधले. देशात गेल्या सात वर्षांच्या भाजप सरकारच्या सत्ताकाळात जनाविरोधी व कॉर्पोरेटधार्जिणी धोरणे, एकाधिकारशाही, धर्मांधता आणि जातपातवाद यांनी धुमाकूळ घातला आहे. त्याविरुद्ध सर्व मार्गांनी सामाजिक जाणीव वाढवून आधी भारतीय संविधानाचे व त्यातील मूल्यांचे प्राणपणाने रक्षण केले पाहिजे, आणि हा प्रवाह आमूलाग्र सामाजिक परिवर्तनाकडे, म्हणजेच समाजवादाकडे वळवला पाहिजे, असे त्यांनी अधोरेखित केले. सध्याच्या अत्यंत बिकट आणि विषमतेने ग्रासलेल्या परिस्थितीत समाजवादच आपल्या देशाला तारू शकेल यावर त्यांनी भर दिला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कामगार दिन व महाराष्ट्र दिन आणि कार्ल मार्क्स जयंती निमित्त ” महाराष्ट्राचे दीपस्तंभ ” या २१ दिवसांच्या ऑनलाईन व्याख्यानमालेला नागरिकांचा वाढता पाठिंबा ही स्वागतार्ह बाब असल्याचे त्यांनी मांडले.
याप्रसंगी माकपचे केंद्रीय कमिटी सदस्य तथा अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, कार्यक्रमाचे अध्यक्ष माकपचे केंद्रीय कमिटी सदस्य महेंद्र सिंह होते, आणि माकपचे राज्य सचिवमंडळ सदस्य डॉ. उदय नारकर यांनी आभारप्रदर्शन केले.