लेखन : कैलास बहिरु फोकणे, पोलीस पाटील घोटी खुर्द
गेल्या २० दिवसांपूर्वी गावातील एक व्यक्ती तसेच एका डॉक्टरांच्या संपर्कात आल्याने कोरोना संसर्ग होणार याची मला जाणीव होती. तसेच झाले १५ दिवसांपूर्वी अचानक थंडी वाजून आली. त्यामुळे एसएमबीटी रुग्णालयात तपासणी केली. अपेक्षेप्रमाणे माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. माझ्यासह मुलगा व पत्नीलाही कोरोनाचा संसर्ग झाला. मग खूप विचार करून सकारात्मक विचार सुरू केला. जे काही ज्यांना यापूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला आणि ते बरे झाले असे काही डॉक्टर, जवळचे मित्र आणि जे हॉस्पिटल मधून लाखो रुपये खर्चून बरे झाले अशा सर्वांशी चर्चा केली. त्यानुसार आपल्या घरीच राहून उपचार घेण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधे व खाण्या पिण्याची काळजी घेतली. त्यामुळे आम्ही तिघेही कोरोनामुक्त झालो आहोत. माझ्या या संकट काळात अनेक आपल्या सारखे मित्र, डॉक्टर व अधिकारी यांनी धीर देत मोठा आधार देण्याचे काम केले. सर्वांच्या तोंडून एकच वाक्य होते “कोरोनाला घाबरू नका, तुम्ही लस घेतली आहे. त्यामुळे तुम्हाला काहीच होणार नाही” आणि खरोखर न घाबरता सामोरे गेल्याने आज आम्ही बरे झालो आहोत. सगळ्यात मोठा धक्का बसला तो म्हणजे मी ज्यांच्या संपर्कात आलो ते कवडदरा येथील डॉक्टर विश्वास बंगाली हे कोरोनाचे बळी ठरले. प्रिय मित्रांनो हा आजार खूप खतरनाक आहे. सकारात्मक विचार करा, घाबरून जाऊ नका. खतरनाक आजार असला तरी आपण त्यावर यशस्वी मात करू शकतो हे ध्यानात घ्या. आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या ही विनंती.