अंधारपुरी झाली इगतपुरी ; महावितरणच्या असंवेदनशीलतेने इगतपुरीची वीज तब्बल दोन दिवस उलटूनही खंडितच !

इगतपुरीनामा न्यूज, दि. १८ : हवामान खात्याने तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा राज्याच्या काही भागात बसणार हा अंदाज दोन दिवसांपूर्वीच व्यक्त केला. जवळपास राज्याच्या सर्वच भागात त्या दृष्टीने प्रशासनाची पूर्वतयारी चालू असतांना इगतपुरी शहर आणि परिसर मात्र वीजेच्या बाबतीत याला अपवाद ठरला आहे. सगळीकडे पूर्वतयारी सुरू असतांना इगतपुरी शहराची वीजपुरवठा करणारी यंत्रणा मात्र अजगरासारखी सुस्त असल्याचे चित्र शहर वासीयांना दोन दिवसांपासून अनुभवायला मिळत आहे. चक्रीवादळ प्रत्यक्षात जिथे जिथे आले तिथेही एवढी अडचण झाली नसेल जितकी इगतपुरीकरांची विजेच्या बाबतीत झाली आहे. शहराला इगतपुरी म्हणावं की अंधारपुरी असा सवाल इगतपुरीकरांपुढे या निमित्ताने उभा ठाकला असून महावितरणच्या ढिसाळ कारभाराला कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी इगतपुरीवासीयांकडून करण्यात येत आहे.

तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वातावरणात झालेल्या बदलांमुळे दोन दिवसांपासून सोसाट्याचा वारा आणि तुरळक पाऊस सुरू आहे. दरम्यान महावितरणचा ढिसाळ कारभार या निमित्ताने इगतपुरीकरांना चांगलाच अनुभवायला मिळाला असून ‘एकवेळ वीज नको पण महावितरणचा आडमुठेपणा आवरा’ अशी मागणी शहर वासीय करत आहेत. तब्बल छत्तीस तासांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही इगतपुरी शहराची बत्ती गुल आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून लाईट कधी येणार यावर साधे स्पष्टीकरणही दिले जात नसल्याने संतापाची भावना निर्माण झाली आहे.

पाणीपुरवठा विस्कळीत
महावितरणच्या आडमुठेपणामुळे इगतपुरी शहर आणि परिसराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. आधीच आठवड्यातुन फक्त दोन दिवस पाणी पुरवठा केला जातो आहे, त्यामुळे पाणी साठवून ठेवणे आवश्यक आहे, त्यातही लाईट नसल्याने शहराच्या कुठल्याही भागात अद्याप पाणी पुरवठा झालेला नाही.

कोविड सेंटरमधल्या रुग्णांची आबाळ
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात सध्या डेडीकेटेड कोविड सेंटर सुरू करण्यात आले असून गंभीर रुग्ण तिथे उपचार घेत आहेत. मात्र महावितरणच्या या ढिसाळ कारभारामुळे रुग्णांच्या जीविताला गंभीर स्वरूपाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

संवेदनाहीन अधिकारी
या सगळ्या पार्श्वभूमीवरही इगतपुरी महावितरणचे अधिकारी अत्यंत असंवेदनशील वागतांना दिसत असून सामान्य नागरिकांना वीजपुरवठा कधी सुरु होणार याची माहिती कधीही स्पष्टपणे मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. कालही रात्री उशिरा काही रहिवाशांनी महावितरणच्या कार्यालयाला भेट दिली असता टेलिफोनचा रिसिव्हर बाजूला काढून ठेवला असल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. अशा असंवेदनशील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कुठलीही कारवाई केली जात नसल्याने ते निर्ढावले असून या सर्वांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी इगतपुरीकर करतांना दिसत आहेत.

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे ‘अप-डाऊन’ इगतपुरीच्या मुळावर
शहरातील महावितरण कार्यालयातील बहुतांश कर्मचारी हे बाहेरगावाहून इगतपुरीत ये-जा करतात. वास्तविक अत्यावश्यक सेवेतल्या या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने मुख्यालयी राहणे अपेक्षित असतांना अपडाऊन करत असल्यामुळे त्यांना घरी जाण्याची घाई असते त्यामुळे कामाकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष केले जाते असा आरोप इगतपुरीकरांनी केला आहे. शिवाय हे अपडाऊन करणारे अधिकारी आणि कर्मचारी प्रवासाचा धोका पत्करून एकप्रकारे कोरोनाला खुले निमंत्रणच देत आहेत. बिल वसुलीच्या निमित्ताने घरोघरी फिरणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामुळे इगतपुरी शहराचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महावितरणच्या ढिसाळ कारभाराचे वाभाडे काढणारे अजूनही बरेच मुद्दे आहेत. सध्या पावसाचे आणि वादळी वातावरण आहे. असे असले तरी अजून प्रत्यक्षात पावसाळा सुरू व्हायचा आहे. अवघ्या दोनच दिवसात शहराच्या विजपुरवठ्याची हालत खराब झाल्याने महावितरणचे वाभाडे निघत असून अशीच परिस्थिती कायम राहिली तर ऐन पावसाळ्यात विजपुरवठ्याची अवस्था किती वाईट असेल ह्याची झलक इगतपुरीकरांना या निमित्ताने पाहायला मिळत आहे.महावितरणच्या ह्या ढिसाळ कारभारामुळे सामान्य इगपुरीकरांमध्ये संतापाची लाट असून सर्व बेजबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान कोविड वार्डात दाखल असलेल्या रुग्णांच्या जीवाशी महावितरण जीवघेणा खेळ खेळत असून विजपुरवठ्याअभावी रुग्णांच्या जीवितास गंभीर धोका झाल्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांना याबाबत जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशीही मागणी केली जात आहे.

या सर्व मुद्द्यांवर प्रतिक्रिया घेण्यासाठी अधिकारी वर्गाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अधिकारी प्रतिसाद देत नसून फोन उचलण्याचीही तसदी घेत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे इगतपुरीचा विस्कळीत वीजपुरवठा आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या या सगळ्यांशी जणू आपला काही संबंधच नाही या थाटातली अधिकाऱ्यांची वर्तणूक किती असंवेदनशील आहे हेच या निमित्ताने अधोरेखित झाले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!