
इगतपुरीनामा न्यूज – पोदार इंटरनॅशनल स्कूल, इगतपुरी येथील विद्यार्थ्यांना जगप्रसिद्ध फ्रीस्टाइल फुटबॉलपटू जेमी नाइट यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची आणि त्यांच्या उपस्थितीचा आनंद घेण्याची सुवर्णसंधी मिळाली. जगातील आघाडीच्या दहा फ्रीस्टाइल फुटबॉलपटूंमध्ये गणना होणारे आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे अनेक विक्रम नावावर असलेले जेमी नाइट यांनी शाळेला सदिच्छा भेट दिली. भारताच्या आठव्या दौऱ्यावर आलेल्या जेमी नाइट यांनी पोदार एज्युकेशन नेटवर्कच्या क्रीडा उत्कृष्टता उपक्रमांतर्गत या विशेष कार्यशाळेचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण करणे, त्यांची एकाग्रता वाढवणे आणि त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे हा यामागचा मुख्य उद्देश होता. आपला अनुभव व्यक्त करताना जेमी नाइट म्हणाले, “भारतात पुन्हा येणे आणि विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास, कौशल्य व सर्जनशीलतेत झालेली प्रगती अनुभवणे, हा नेहमीच आनंदाचा क्षण असतो. पोदार इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांचा उत्साह अतुलनीय आहे. त्यांची ऊर्जा आणि गुणवत्ता मला नेहमीच प्रेरणा देते.” फ्रीस्टाइल फुटबॉलमुळे शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य वाढून आव्हानांवर मात करण्याची सकारात्मक वृत्ती निर्माण होते, असेही त्यांनी सांगितले.
फुटबॉलवरील असाधारण नियंत्रण कौशल्य आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्ससोबतच्या सहकार्यासाठी जेमी नाइट जगभर प्रसिद्ध आहेत. UEFA EURO 2020 चे अधिकृत जागतिक शुभंकर म्हणून सादरीकरण असो वा २०१७ आणि २०१८ मधील UEFA चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यांमधील त्यांची जादू असो, त्यांनी नेहमीच जगातील दिग्गज फुटबॉलपटूंचे मन जिंकले आहे. या कार्यशाळेत त्यांनी सादर केलेल्या गुरुत्वाकर्षणाला आव्हान देणाऱ्या चित्तथरारक कसरती आणि अचूक कौशल्याने उपस्थित सर्व विद्यार्थी अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. पोदार एज्युकेशन नेटवर्कचे संचालक हर्ष पोदार यांनी सांगितले, “जेमी नाइट यांच्या प्रत्येक भेटीचा विद्यार्थ्यांवर कायमस्वरूपी सकारात्मक प्रभाव पडतो. त्यांच्या कार्यशाळा केवळ फुटबॉलचे कौशल्य शिकवण्यापुरत्या मर्यादित नसून, त्या विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, एकाग्रता आणि चिकाटी यांसारखे महत्त्वाचे गुण विकसित करतात. विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा अशा अनुभवातून मिळते.” ९९ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या आणि १९२७ मध्ये शेठ आनंदीलाल पोदार यांनी स्थापन केलेल्या (ज्या ट्रस्टचे पहिले अध्यक्ष महात्मा गांधी होते) पोदार एज्युकेशन नेटवर्कने नेहमीच शिक्षणासोबतच क्रीडा आणि कला क्षेत्रांत उत्कृष्टतेला प्राधान्य दिले आहे. आज देशभरात १६५ हून अधिक शाळा आणि २ लाख ७५ हजारांहून अधिक विद्यार्थी असलेली ही संस्था विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध करून देत आहे. शाळेतील या प्रेरणादायी कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये एक नवा उत्साह) निर्माण केला असून पालकांकडूनही या उपक्रमाचे जोरदार स्वागत होत आहे.
