गोंदे दुमाला गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधार व तडीपार आरोपी एलसीबीच्या जाळ्यात ; गावठी कट्टा जप्त

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्ह्याच्या वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोंदे दुमाला एमआयडीसी परिसरात झालेल्या गोळीबार (फायरिंग) प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि नाशिक जिल्ह्यातून तडीपार असलेला कुख्यात आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने जेरबंद केला आहे. आरोपीच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेला एक गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला असून, त्यानेच स्वतः घटनास्थळावर गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्ह्याअंतर्गत (गु.र.नं. २८३/२०२६) बीएनएस कलमे १०९, ३०८(५), ११८(१), १८९(१, २, ४), १९१(३), ३९१(२), ३५२, १९०, ३(५) तसेच भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आणि नाशिक जिल्ह्यातून तडीपार असलेला आरोपी विशाल सुरेश राव, वय २८, रा. मुकणे, ता. इगतपुरी, जि. नाशिक हा फरार होता.

पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे नाशिकच्या जिल्हा न्यायालय रोडवर सापळा रचून आरोपी विशाल राव याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता, त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले गावठी कट्ट्याचे हत्यार जप्त करण्यात आले असून, याच कट्ट्यातून त्याने स्वतः घटनास्थळावर फायरिंग केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. ही धडक कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती विमला आर यांच्या आदेशानुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी योगेश मस्के, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल मोरे आणि वाडीवऱ्हेचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, पोलीस हवालदार प्रवीण काकड, नवनाथ शिरोळे, संतोष दोदे, संदीप नागपुरे, प्रवीण गांगुर्डे, रवींद्र गवळी, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, विक्रम काकड, विशाल बोराडे आणि केशव बस्ते यांच्या पथकाने सहभाग घेऊन ही यशस्वी कामगिरी पार पाडली आहे.

error: Content is protected !!