
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेने फिर्यादीच्या बॅगमधून एटीएम कार्ड काढून घेत त्यांच्या संमतीशिवाय तब्बल १ लाख ५७ हजार ७०० रुपये काढून घेतल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जून २०२५ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास इगतपुरी रेल्वे स्टेशन परिसरात ही घटना घडली. आरोपी महिला दुर्गा अश्विन लहरे, रा. स्वामी समर्थ नगर, गोळीबार मैदान, इगतपुरी, जि. नाशिक हिने फिर्यादी अनिकेत जगन्नाथ मेने, वय ३०, रा. शिरुड, ता. जि. धुळे यांच्या बॅगमधून त्यांचे एटीएम कार्ड परस्पर काढून घेतले आणि एटीएम मशिनद्वारे १ लाख ५७ हजार ७००रुपये काढून त्यांची फसवणूक केली. फिर्यादीने या प्रकाराबाबत विचारणा केल्यानंतर आरोपी महिलेने सुरुवातीला पैसे देण्यास नकार दिला. मात्र, फिर्यादीने पोलीस ठाण्यात तक्रार करण्याबाबत सांगितल्यानंतर आरोपीने पैसे देण्याचे मान्य केले. तिने २ जून २०२६ रोजी भारतीय स्टेट बँक, इगतपुरी शाखेचा १ लाख रुपयांचा चेक फिर्यादीला दिला. परंतु फिर्यादीने तो चेक वटवण्यासाठी बँकेत टाकला असता, ‘पेमेंट स्टॉप बाय ड्रॉवर’ या कारणास्तव तो न वटताच परत आला. जेव्हा फिर्यादीने ही बाब आरोपी महिलेला कळवली, तेव्हा तिने “मला पैसे द्यायचे नाहीत, तुम्हाला काय करायचं ते करा,” असे बोलून उर्मटपणा केला आणि फसवणूक कायम ठेवल्याने अखेर पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला. इगतपुरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ३१६(२), ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.