कोरोना साथ काळात औषध निर्माण अधिकारी संघटनेमार्फत प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन

इगतपुरीनामा न्यूज, दि. ८
भारत देशासह महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या साथीच्या लाटेने कहर केला आहे. नाशिक जिल्हा हा कोरोना वाढत्या संख्येत संपूर्ण भारत देशात दहा क्रमांकामध्ये असल्याची नोंद झाली आहे. कोरोना साथ काळात गेल्या वर्षभरापासून शासकीय रुग्णालयीन औषध निर्माण अधिकारी हे कोरोना साथरोग कार्यक्रमात पहिल्या फळीतील कर्मचारी म्हणून आरोग्य सेवेत कर्तव्य बजावत आहे. सामाजिक बांधिलकी उपक्रम म्हणून दैनंदिन शासकीय कामकाज सांभाळून शासकीय रुग्णालयात कामकाज करणाऱ्या औषध निर्माण अधिकारी यांची नोंदणीकृत औषध निर्माण अधिकारी संघटना, जिल्हा शाखा नाशिक यांचे मार्फत रक्तदान शिबिर, आपत्तीग्रस्तांना मदत, शासकीय कन्या विद्यालय नाशिक येथील मुलींना मोफत वह्या वाटप असे सामाजिक बांधिलकीचे उपक्रम संघटनेच्या व्यासपीठावरून राबविले जातात.
सध्या महाराष्ट्र राज्यात त्यात प्राधान्याने नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढलेला असुन कोरोना बाधित रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी कोरोना रुग्णांना जीवदान देणारी ठरत आहे. सामाजिक बांधिलकी उपक्रम म्हणून ज्या औषध निर्माण अधिकारी यांना कोरोना होऊन गेलेला आहे अशा औषध निर्माण अधिकारी यांनी आज अर्पण रक्तपेढी, नाशिक येथे प्लाझ्मा दान शिबीर आयोजित केलेले होते. या शिबिरामध्ये अनुक्रमे प्रशांत रोकडे, उमेश अग्रवाल, पुरुषोत्तम खैरनार, रितेश अग्रवाल या औषध निर्माण अधिकारी यांनी कोरोना आजारामधुन बरे झाल्यानंतर प्लाझ्मा दान केले.
आजच्या कोरोना महामारीच्या काळात प्लाझ्मा दान शिबीर व रक्तदान शिबिर यांचे आयोजन होऊन सामाजिक बांधिलकी म्हणुन अशी शिबिरे खूप आवश्यक असून भविष्यात थोडेच दिवसात दुसऱ्या प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन पुन्हा करणार असल्याचे मत औषध निर्माण अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष फैय्याज खान यांनी नमूद केले.
शिबीर यशस्वी होण्यासाठी औषध निर्माण अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष विजय देवरे, संघटनेचे राज्य समन्वयक जनार्दन सानप, संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत राजभोज, जिल्हा सरचिटणीस सचिन अत्रे, उमेश अग्रवाल, सोनाली तुसे, प्रेमानंद गोसावी यांनी विशेष प्रयत्न केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!