लेखन - ॲड. गौतम नाठे, भाजपा कायदा आघाडी इगतपुरी तालुकाध्यक्ष
निवृत्ती नाठे, कार्यकारी अध्यक्ष, प्राथ. शिक्षक संघ नाशिक जिल्हा

सह्याद्रीच्या कुशीत वसलेला, निसर्गाचे सौंदर्य लाभलेला, साधी भोळी मन मनमिळावू माणसं, अवीट चवीचा तांदूळ, पावसाचे माहेरघर, थंड हवेचे ठिकाण आणि सीमेवर असलेलं महाराष्ट्राभर सर्वोच्च कळसूबाईचे शिखर म्हणून प्रसिद्ध असलेला तालुका म्हणजेच इगतपुरी. स्वर्गासम सौंदर्य लाभल्याने तिला कौतुकाने इंद्रपुरी म्हटले जाते. इंद्रपुरीची भुरळ इंग्रजांना देखील पडली होती, म्हणूनच त्यांनी उन्हाळ्याच्या काळात राहण्यासाठी इगतपुरीच्या परिसरात सुंदर बंगले बांधले आणि इगतपुरी तालुका थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध पावला. इंद्रपुरीच्या या मातीत दोन रत्न जन्मली ती म्हणजे महर्षी पुंजाबाबा गोवर्धने आणि दुसरे म्हणजे लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे. स्वातंत्र्य चळवळीतील एक व्यक्तिमत्व, भात लढा देशभर गाजवणारे ते म्हणजे महर्षी पुंजाबाबा गोवर्धने. दुसरे अलौकिक व्यक्तिमत्व म्हणजे लोकनेते स्व. गोपाळराव रावळाजी गुळवे. लष्करासाठी जमीन संपादित झालेल्या बेलगाव कुऱ्हे येथे सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेला हा गोपाळ पुढे इगतपुरी तालुक्याचा भाग्यविधाता झाला. काँग्रेसच्या विचारांचे पाईक असलेले गोपाळराव गुळवे यांनी आपल्या कार्य कर्तृत्वाने राजकारणातील अनेक पदे आणि मानसन्मान मिळवले. जिल्हा परिषद अध्यक्षाला राज्यमंत्र्यांचा दर्जा मिळालेले हे राज्यातील पहिले जिल्हा परिषद अध्यक्ष होते. पंचायत राज कमिटीचे अखिल भारतीय उपाध्यक्ष म्हणून देखील एक मोठं कार्य त्यांनी पंचायतराज क्षेत्रात करून दाखवले. आपली माती आपली माणसं आणि आपला पक्ष यांच्याशी ते कायम एकनिष्ठ राहिले. आणि निष्ठाही कार्यप्रवण असते हे त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये सिद्ध करून दाखवले. आजही त्यांचं दृश्य रूपाने असलेले कार्य म्हणजे त्यांनी इगतपुरी तालुक्यांमध्ये उभं केलं शैक्षणिक संस्थांचे जाळे. स्वातंत्र्यानंतर गावोगावी जिल्हा परिषदेच्या शाळा उभ्या राहिल्या. परंतु तालुक्यातील घोटी, इगतपुरी, टाकेद असे अपवादात्मक ठिकाणी वगळता माध्यमिक शिक्षणाची कुठेही सोय नसल्याने इगतपुरी तालुका हा शिक्षणाच्या बाबतीत जिल्ह्यात सर्वात मागे असलेला तालुका होता. लोकनेते गोपाळराव गुळवे यांनी हे तालुक्याची खरी अडचण ओळखून तालुक्यांमध्ये माध्यमिक शाळांचे जाळे उभे केले आणि आज खऱ्या अर्थाने तालुका शिक्षणाच्या क्षेत्रात इतर तालुक्यांच्या तोडीस तोड आपली गुणवत्ता सिद्ध करीत आहे. गेल्या ३० वर्षात तालुक्यामध्ये शिकलेली ७५ टक्के पिढी ही लोकनेते गोपाळराव गुळवे यांनी उभ्या केलेल्या शाळांमधून शिकलेली असून आपले जीवन घडवत आहेत. अन्नदानाने एक वेळची भूक भागेल, वस्त्रदानाने काही दिवसाची गरज भागेल परंतु ज्ञानदानाने कित्येक पिढ्या समृद्ध करण्याचं काम गोपाळराव दादा यांनी केलेलं आहे. हेच त्यांच्या चिरंतन कार्याची कायम आठवण करून देत राहील. . अफाट जनसंग्रह असलेला हा नेता आज जरी काळाच्या पडद्याआड गेलेला असला तरी आजही इगतपुरी तालुक्याची ओळख लोकनेते गोपाळराव गुळवे यांचा तालुका अशीच आहे. आणि ती वर्षानुवर्ष अशीच राहील. त्यांच्या ८५ व्या जयंतीनिमित्त या अफाट लोकप्रिय लोकनेत्याला विनम्र अभिवादन..!