
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज -काही दिवसाच्या इगतपुरी तालुका मुसळधार पावसाने झोडपून काढला आहे. यामुळे सामान्य नागरिक, महिला, युवती, युवक, व्यापारी आदींचा कारभार ठप्प पडला असल्याचे दिसते. पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर होतीलही पण काही अडचणी पाऊस नसला तरी सुटतील असे वाटत नाही. या समस्यांचा फटका इगतपुरी शहरातील विविध शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाला बसतो की काय अशी परिस्थिती उद्भवली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने इगतपुरीतील राम मंदिर, शिवाजी चौक, नवा बाजार येथील रेल्वे क्रॉसिंग बंद केली आहे. त्यामुळे येथून येणाऱ्यांना ३ ते ४ किलोमीटर लांब असणाऱ्या पर्यायी मार्गाने वळसा घालून यावे लागते. मात्र संबंधित भागातून इगतपुरी शहरातील शाळांमध्ये शिकणारे चिमुकले विद्यार्थी रेल्वेची संरक्षक भिंत चढून इगतपुरीत येत आहेत. विद्यार्थ्यांचा हा घातक असणारा जीवघेणा प्रवास उराची धडकी वाढवणारा ठरला आहे. हे विद्यार्थी भिंत पार करण्याच्या आधी रेल्वेच्या लाईनी ओलांडतात. अचानक वेगात रेल्वे गाडी आल्यास प्रचंड मोठी दुर्घटना घडू शकते. तरीही हे विद्यार्थी जीव मुठीत धरून पाठीवरचे दप्तर सावरत भिंत ओलांडत आहेत. एकीकडे अतिपावसामुळे विद्यार्थ्यांचे संपूर्ण लक्ष पावसापासून बचाव, वेळेत शाळेत पोहोचणे, दप्तर ओले होऊ न देणे याकडे असते. परिणामी पालकांची आणि सामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे. पिंपरी फाटा येथील प्रस्तावित पुलाचे कामही चालू झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाचवीला पूजलेला जीवघेणा प्रवास कधी थांबेल याची सर्वांना प्रतीक्षा आहे. गावठा, मिलिंदनगर, शिवाजी नगर, आठचाळ, पाईप लाइन येथील अनेक विद्यार्थ्यांना ह्याच प्रकारे शाळेत यावे लागते.