इगतपुरी येथे खरीप हंगाम पूर्व कार्यशाळा संपन्न : तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रात्यक्षिके

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत विभागीय कृषी संशोधन केंद्रात खरीप हंगाम यशस्वीतेसाठी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. हेमंत पाटील यांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामातील प्रमुख पिके व लागवड तंत्रज्ञान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी केले. कृषी विभागाच्या सहकार्याने आधुनिक शेती करून आपले उत्पन्न वाढवावे असे आवाहन डॉ. पाटील यांनी  केले. याप्रसंगी सहयोगी प्राध्यापक डॉ. अविनाश कोलगे यांनी तालुक्यातील प्रमुख भात पिकाचे लागवड तंत्रज्ञान व चारसूत्री लागवड पद्धत याविषयी सविस्तर माहिती दिली. डॉ. दीपक डामसे, (खुरासनी पैदासकार) यांनी खुरासनी ,वरई, नागली या पिकांच्या लागवडीविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेत डॉ. हेमंत पाटील, डॉ. अविनाश कोलगे, डॉ. दीपक डामसे, तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी शेतकऱ्यांच्या शंका, अडचणींचे समाधान केले. शेतकऱ्यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपल्या शंकांचे समाधान करून घेतले. शेतकऱ्यांसाठी भात आणि सोयाबीन बियाण्यांसाठी भौतिक, रासायनिक आणि जैविक बीज प्रक्रिया, सोयाबीन उगवण क्षमता चाचणी, माती तपासण्यासाठी मातीचा नमुना प्रत्यक्ष शेतात कसा काढावा, दशपर्णी अर्क कसा तयार करावा, भाताची नियंत्रित लागवड आणि एसआरटी लागवड पद्धत (सगुना राइस टेक्नॉलॉजी) यांचे प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावर करून दाखवण्यात आले. शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेत कृषी विभागाचे आभार मानले. कृषी पर्यवेक्षक किरण सोनवणे, किशोर भरते, राजेंद्र काळे, महेश वामन, शिवचरण कोकाटे, अशोक राऊत, संगीता जाधव, जयश्री गांगुर्डे, मोनिका जाधव, नेहा चौधरी, दीपक भालेराव, रावसाहेब जोशी आदी  कर्मचाऱ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवले. सूत्रसंचालन मंडळ कृषी अधिकारी मनोज रोंगटे यांनी केले. यावेळी वामन खोसकर, गोविंद धादवड, दगडू सदगीर, भास्कर सदगीर, विनायक भोंडवे, देवराम पिंगळे, लक्ष्मण भोर, श्रीराम रणमाळे, देवराम गवारी यांच्यासह तालुक्यातील विविध भागातून शेतकरी उपस्थित होते.. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी भास्कर गीते, संतोष सातदिवे, विजय जाधव, मनोज रोंगटे यांनी प्रयत्न केले.

error: Content is protected !!