
इगतपुरीनामा न्यूज – पावसाच्या माहेरघरी इगतपुरी तालुक्यात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. तालुक्यातील १७ गावांमधे १८ टँकरच्या माध्यमातून वाड्या पाड्यांवर पाणीपुरवठा सुरू असुन तहसीलदारांकडे नव्याने ३ टँकरचे प्रस्ताव आले आहेत. पावसाळा सुरू होण्यासाठी दीड महिन्यांचा कालावधी असून अशीच परिस्थिती राहिली तर टँकरची मागणी वाढण्याची शक्यता आहे. सरासरी ३५०० मिलिमीटर धो धो पाऊस पडणाऱ्या पावसाच्या इगतपुरी तालुक्याच्या ग्रामीण भागात शासनाच्या उदासीन धोरणामुळे कृत्रिम पाणीटंचाईचा सामना गोरगरीब आदिवासी जनतेला सहन करावा लागत आहे. पेय जल योजना, जल जीवन मिशन योजना प्रभावीपणे राबवल्या न गेल्याने आदिवासी जनतेचे हाल सुरु आहे. टँकर आल्यावर महिलांना धावाधाव करावी लागत आहे. इगतपुरी तालुक्यातील मुख्य धरणाच्या पाणीसाठ्यात घट झाली असून अनेक धरणात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणी साठा आहे. अनेक धरणे तळ गाठण्याच्या मार्गावर आहेत.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सद्य स्थितीत इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरणात ४६.११ टक्के, वाकी धरणात ३८.५२ टक्के, भाम् धरणात २४.८८ टक्के, भावली धरणात २७.४८ टक्के, वालदेवी धरणात ४५.३७ टक्के, दारणा धरणात ४१.३२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठ्या वैतरणा धरणात ४६.८० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. राहता,कोपरगाव येथील कॅनॉलमध्ये उन्हाळी हंगामाच्या दुसऱ्या आवर्तनासाठी दारणा धरणातून १००० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. वाळविहीर, मांजरगाव, सोनोशी, अधरवड, मायदरा धानोशी, कुरुंगवाडी, आंबेवाडी, चिंचलेखैरे, खेड, भावली बुद्रुक, आवळखेड, वासाळी, वाघेरे, मुंढेगाव, खैरगाव, भरवज निरपण, काळुस्ते ह्या गावांना टँकर आहे. तर शेवगेडांग, कऱ्होळे, टाकेद बुद्रुक या गावांसाठी तहसील कार्यालयात टँकरचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत.