
इगतपुरीनामा न्यूज – घोटीतील जैन मंदिर जुना भंडारदरा फाटामार्गे ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या बसेस सोडाव्यात अशी मागणी खासदार राजाभाऊ वाजे युवा मंच तथा माऊली फाउंडेशनचे संस्थापक विनायक काळे, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे यांनी नाशिकच्या विभागीय नियंत्रकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या एसटी बसेस मागील काही दिवसांपासून शहराबाहेरून सोडल्या जातात. त्यामुळे वृद्ध नागरिक, विद्यार्थी व शेतकऱ्यांचे अतोनात हाल सुरु आहे. याबाबत नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांची माऊली फाउंडेशनचे संस्थापक विनायक काळे, तुकाराम वारघडे यांनी भेट घेत टाकेद गटातील एसटी बसच्या समस्या सांगितल्या. आदिवासी ग्रामीण भागात परिवहन महामंडळाची सर्वसामान्य जनतेच्या हक्काची बस अनेक दुर्गम भागात धावते आहे. गोरगरिबांना ने आण करणाऱ्या अनेक बसेसची परिवहन महामंडळाने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. नादुरुस्त बसेसमुळे प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. परिवहन महामंडळाने नादुरुस्त बस दुरुस्त कराव्यात. इगतपुरी तालुक्याच्या विविध गावांमधून शेकडो विद्यार्थी नाशिकला शिक्षण घेण्यासाठी बसने नियमित प्रवास करतात. बस रस्त्यातच बंद पडल्याने जेष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. एका दिवसात इगतपुरी तालुक्यातुन हजारो प्रवासी बसने प्रवास करतात. नादुरुस्त बसमुळे विद्यार्थ्यांना खुप समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाला वेळ मिळण्याऐवजी बसची वाट पाहण्यात त्यांचा बहुमोल वेळ वाया जातो. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या, नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी तात्काळ बसेसच्या फेऱ्या वाढवाव्या. घोटीतील जैन बस स्टॉप जुना भंडारदरा फाटा मार्गे ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या बसेस सोडाव्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली.