घोटी – अन्न व औषध प्रशासनाची विना बीआयएस, मिथ्याछाप, लेबलदोष पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर निर्मिती कारखान्यावर धाड

इगतपुरीनामा न्यूज – अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न), उ. सि. लोहकरे, अन्न सुरक्षा अधिकारी गो. वि. कासार, यांनी १८ जानेवारीला घोटी येथील मे. साईमेवा फुड ॲण्ड बेव्हरजेस येथे छापा टाकला. त्याठिकाणी तपासणीअंती सदर पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरची निर्मिती ही विना बीआयएस प्रमाणपत्र तसेच आक्षेपार्ह लेबल असलेले, मिथ्याछाप व लेबल दोषयुक्त साठा आढळून आला. सदरचे उल्लंघन हे कायद्यानुसार आक्षेपार्ह असल्याने अन्न सुरक्षा अधिकारी श्री. कासार यांनी कमीदर्जा / असुरक्षित पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरच्या साठा असल्याच्या संशयावरुन नमुने घेतले. पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरच्या एकुण 21 हजार 324 पॅक बॉटल्स 1 लिटरच्या, किंमत रु.4 लाख 26 हजार 488 व छापलेले लेबल्स, 26 रोल्स्, किंमत रु.19 हजार 110 असा एकुण किंमत रु.4 लाख 45 हजार 598 इतक्या किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. घेतलेले नमुने विश्लेषणासाठी अन्न विश्लेषक यांचेकडे पाठविण्यात येत असून विश्लेषण अहवाल प्राप्त होताच विश्लेषण अहवालानुसार अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत पुढील आवश्यक कारवाई करण्यात येईल. नाशिक विभागातील सर्व पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरचे उत्पादकांनी त्यांचेकडे त्यांचे स्थापित उत्पादन क्षमतेनुसारच राज्य / केंद्र अन्न परवाना असल्याची तसेच विधीग्राह्य बीआयएस प्रमाणपत्र असल्याची खातरजमा करुनच व्यवसाय करण्याचे आवाहन नाशिक विभागाचे सह आयुक्त सं. भा. नारागुडे यांनी केले आहे. सदरची कारवाई, सहाय्यक आयुक्त (अन्न) उ. सि. लोहकरे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल कासार यांच्या पथकाने सह आयुक्त सं. भा. नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

Similar Posts

error: Content is protected !!