इगतपुरीनामा न्यूज – लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना आश्वस्त केले होते. महिलांच्या जीवनात सुखाचे, आनंदाचे दिवस यावे हीच भाऊ म्हणून प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये माहेरचा आहेर मिळणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते. मात्र इगतपुरी तालुक्याच्या अतिदुर्गम आदिवासी भागातील लाडक्या बहिणींना भर पावसाळ्यात बँकेच्या आवारात मुक्काम करण्याची अवघड वेळ आली आहे. बँकेच्या बचत खात्याला आधार लिंक आणि केवायसी करण्यासाठी ह्या बहिणींवर उघड्यावर मुक्कामी थांबण्याची अवघड परिस्थिती उदभवली आहे. बुधवारी रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान आदिवासी वाड्यापाड्यावरील ह्या महिलांनी घोटी येथील स्टेट बँकेच्या आवारात मुक्काम ठोकला आहे. केवायसी व आधार लिंक फॉर्म भरण्यासाठी ह्या महिला येथे आल्या आहेत. बँकेत चार पाच दिवसांपासून रोज येऊनही प्रचंड गर्दीमुळे गावी परत जावे लागते. बँकेचा कारभार जास्तच ढिलाईचा असल्याने सकाळ पासून येऊनही काम होत नसल्याने महिलांनी बँकेच्या आवारातच रात्री मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. लांब गाव पाड्यातून महिलांना या कामासाठी रोज येजा करून भाडे परवडत नसल्याचे त्यांनी सांगितले. सकाळी बँक उघडल्यावर लवकर नंबर लागेल अन लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील या आशेने आलेल्या महिलांनी बँकेच्या आवारात मुक्काम ठोकल्याने बँकेचाही कारभार चव्हाट्यावर आला आहे. वर्षभर नेहमीच ह्या बँकेत गर्दीचे साम्राज्य असते. ह्या शाखेचा विस्तार करून तालुक्याच्या अन्य भागात शाखा उघडण्याची जुनी मागणी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिकमध्ये उद्या होणाऱ्या कार्यक्रमासाठी सूक्ष्म नियोजन सुरु असून कार्यक्रमाला येणाऱ्या महिलांची बडदास्त ठेवली जाणार आहे. दुसरीकडे बँकेच्या आधार लिंक आणि केवायसीसाठी आदिवासी महिलांवर उघड्यावर मुक्कामी येण्याचा दुर्दैवी प्रसंग आला आहे.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group