प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – काही दिवसांपूर्वी नाशिक मुंबई महामार्गावर आठवा मैल जवळील पायलट हॉटेल समोर भर दुपारी पहिलवान भूषण लहामगे याचा धारदार हत्याराने व गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या हत्येप्रकरणी भूषणचा चुलत भाऊ वैभव लहामगे यास अटक करत वाडीवऱ्हे पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार वाडीवऱ्हे पोलीस स्टेशन मध्ये कलम 302, 109, 506, 34 अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. वाडीवऱ्हे पोलिसांनी सर्व बाजूंनी कसोशीने तपास करून भूषण लहामगेचा चुलतभाऊ वैभव यशवंत लहामगे यास अटक करून त्याच्याकडून ह्या गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार त्र्यंबकेश्वर येथील पार्किंग मधून तर वालदेवी धरणालगत पूरून ठेवलेला गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा हस्तगत केला. या गुन्ह्यात वैभव याचे इतर दोन साथीदार देखील सहभागी असल्याची कबुली वैभव याने दिली असून ते अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
वैभव लहामगे ठाणे येथील वागळे इस्टेट मधील चेकमेट दरोडा प्रकरणातील आरोपी असून तो सध्या जामिनावर बाहेर आहे. वैभव आणि भूषण याचा वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीवरून वाद होता. त्या कारणावरून त्याने भूषण लहामगे याचा खून केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नाशिक शहरातील सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दहा किलो सोने घरफोडी प्रकरणात देखील वैभव लहामगे याचे नाव नाशिक शहर पोलिसांच्या तपासात समोर आले असल्याचे समजते. ह्या गुन्ह्याचा तपास नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली वाडीवऱ्हेच्या पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव, उपनिरीक्षक सुनील बिराडे, राजू पाटील, पोलीस नाईक प्रविण काकड, विक्रम काकड, शरद धात्रक, अदीप पवार, धोंगडे, मांडवडे, येशी, गिते, तुपलोंढे, बोराडे आदींच्या पथकाने ही कामगिरी बजावली.