बारावीच्या परीक्षेत चांगले मार्क मिळवायचेय ? ; मग हे मार्गदर्शन वाचायलाच हवे

कुठल्याही क्षेत्रात करिअर करायचे असेल तर बारावीचे वर्ष त्यासाठी टर्निंग पॉइंट ठरते. हा टप्पा यशस्वीपणे पार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय तयारी करावी ? पालकांनीही काय काळजी घ्यावी ? कोरोनामुळे मिळालेल्या वेळेची संधी जास्त चांगले मार्क मिळविण्यासाठी कसा उपयोग करावा ? अशा अनेक प्रश्नांवर परिणामकारक उत्तरे देणारा मार्गदर्शक लेख.

मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क : 9822478463

बारावीचा अभ्यास
बारावीचे वर्ष सर्व पालक आणि विद्यार्थी यांच्यादृष्टीने महत्त्वाचे वर्ष असते. सर्वच पालकांना आपल्या पाल्याने या वर्गात चांगले गुण मिळवावेत अशी अपेक्षा असते. त्यामुळे विद्यार्थ्यांवर नकळत ओझे वाढल्यासारखे वाटते. या वर्गातील कला, वाणिज्य, विज्ञान आणि किमान कौशल्यावरील अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना कोरोनामुळे बारावीच्या परीक्षा पुढे गेल्यामुळे अभ्यासासाठी अधिक वेळ मिळणार आहे. यावेळेचा बारावीच्या परीक्षेत चांगले गुण, चांगले मार्क मिळविण्यासाठी उपयोग करता येईल. ही एक चांगली संधी आहे. या संधीचा चांगला उपयोग विद्यार्थ्यांनी आपले भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी केला पाहिजे. अंतिम टप्प्यात अभ्यासाची चांगल्या प्रकारे तयारी करणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारची भीती , दडपण किंवा ताण तणाव निर्माण होऊ देऊ नका.

पालकांची भूमिका
विद्यार्थ्यांना सहकार्य करणे, त्यांच्या मनातील भीती दूर करणे, योग्य प्रकारचे मार्गदर्शन करणे ही पालकांची भूमिका असली पाहिजे. आपल्या पाल्याची इतरांबरोबर तुलना करण्याचे टाळावे. कोणत्याही प्रकारची अभ्यासाची जबरदस्ती करू नये. विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार, त्याच्या कलाने, पध्दतीने त्याला अभ्यास करु द्यावा. त्याला येणाऱ्या अडचणी दूर करून तुझ्यामध्ये सामर्थ्य आहे याची जाणीव निर्माण करून पालकांनी पाल्यांचा आत्मविश्वास वाढविला पाहिजे. त्याच्याबरोबर नाते हे मित्रत्वाचे कसे राहील याचा सतत विचार  करा म्हणजे संघर्ष निर्माण होणार नाही.

अभ्यासातील सातत्य
बारावीच्या परीक्षेला कोरानामुळे अधिक दिवस मिळाले आहेत. विद्यार्थ्यांनी आता आपल्या अभ्यासात सातत्य ठेवावे. एकाच दिवशी खूप अभ्यास केला आणि चार दिवस काहीच केले नाही असे होऊ देऊ नका. अभ्यासातील सातत्यामुळे एकसलगता निर्माण होते. अभ्यास सोपा होतो आणि अभ्यासाची व्याप्ती उलगडत जाते. अभ्यासातील सातत्याचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे त्या त्या विषयाचे ज्ञान पक्के होते. खूप पाठांतर करावे लागत नाही.

कठीण भागाची उजळणी
प्रत्येक विषयात काही भाग विद्यार्थ्यांना कठीण वाटतो. हा कठीण वाटणारा भाग सोपा करण्यासाठी त्याची उजळणी होणे गरजेचे असते. त्यासाठी त्या भागाचे पहिले वाचन, दुसरे वाचन करावे. यामुळे चांगल्या प्रकारे अभ्यास होतो. कठीण भागाची भीती दूर होते. खूपच कठीण जाणाऱ्या भागाचे वहीत लेखन करा आणि पुन्हा त्याचे वाचन करा. असे केल्याने अभ्यासाची भीती दूर होते हे लक्षात ठेवा.

प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
विद्यार्थ्यांनी सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे ती म्हणजे प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप सर्वप्रथम लक्षात घ्या. प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये किती प्रश्न विचारले जाणार आहेत, त्याला किती गुण आहेत, प्रश्नांचे स्वरुप कसे आहे या सर्व गोष्टींची माहिती चांगल्या प्रकारे करून घ्या. म्हणजे त्या पध्दतीने त्या विषयाचे वाचन करता येईल. वाचताना एक गोष्ट विद्यार्थ्यांनी सतत लक्षात ठेवावी ती म्हणजे प्रश्न कसा विचारला जाईल ? त्यामुळे अभ्यास सहज सोपा होत जातो. आपल्याला अभ्यास सोपा करावयाचा आहे हे लक्षात घ्या.

वाचन आणि लेखन करा
बरेच विद्यार्थी फक्त वाचन करतात. त्यामुळे अभ्यासाचा कंटाळा येतो. काही वेळ वाचन करा, काही वेळ लेखन करा. त्यामुळे लेखनाची सवय राहते. अभ्यासात नावीन्य निर्माण करता येते. लेखन करतानाच हस्ताक्षर, शुद्धलेखन याकडे लक्ष द्या. लेखनाची गती वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहा. परीक्षेत दिलेल्या वेळेत आपल्याला सर्व प्रश्न सोडविता आले पाहिजेत याची जाणीव सतत असली पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा चांगला अभ्यास झालेला असतो परंतु दिलेल्या वेळेत सर्व प्रश्न सोडविता येत नाहीत. म्हणून अभ्यासामध्ये काही काळ लेखन व काही काळ वाचन करणे गरजेचे असते.

वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी
प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिकेत रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, कंसातील योग्य शब्द निवडून रिक्त स्थानाची पूर्तता करा, एका वाक्यात उत्तरे लिहा या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांची विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची तयारी करावी. कारण येथे योग्य उत्तराचे सर्व गुण मिळविता येतात. येथे अचूक उत्तराला  महत्त्व असते. या प्रकारचे प्रश्न परीक्षेत आपल्याला भरपूर गुण मिळवून देतात. त्यामुळे प्रत्येक विषयात चांगला स्कोअर करू शकतो. यासाठी बारीक वाचन करा. लक्षात न राहणारा भाग पाठ करा. काही भागाचे पाठांतर करावे लागणार आहे हे लक्षात घ्या.

प्रश्न सोडविण्याचा सराव
अंतिम टप्प्यामध्ये प्रश्न सोडविण्याचा भरपूर सराव करावा. त्यामुळे प्रश्नांचे स्वरूप लक्षात येते. प्रत्येक प्रकारातील प्रश्न सोडविण्याचा आत्मविश्वास मनात निर्माण होतो. त्यामुळे परीक्षेविषयी मनातील भीती नाहीशी होते. अभ्यास सोपा होतो. प्रश्न सोडविताना वेळेचे नियोजन केल्यास अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास होतो. अभ्यासाच्या सर्व सवयींचा वापर करा. वाचन, लेखन, पाठांतर, लेखनाची गती वाढविणे, बारीक वाचन करणे, समजून घेऊन वाचन करणे इत्यादी सर्व गोष्टी अभ्यास करताना करा. यामुळे अभ्यासात विविधता येईल. अभ्यासाविषयीचा कंटाळा दूर करता येईल आणि परीक्षेविषयीचे कोणतेही दडपण मनावर येणार नाही याची काळजी घ्या. सर्व विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळण्यासाठी हार्दिक शुभेच्छा..!            

( लेखक इगतपुरी येथील केपीजी कॉलेजचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. )

Similar Posts

4 Comments

  1. avatar
    प्रा. रोमा विष्णुसिंग परदेशी says:

    12 वी च्या विदयार्थ्यांसाठी खूप छान माहिती आहे.

  2. avatar
    विलास जोपळे says:

    सदर लेख निव्वळ बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे..असे गृहीत न धरता पालक व विद्यार्थी या सर्वांसाठी खूप महत्वपूर्ण आहे..अभ्यास व त्याचे नियोजन,सराव करताना घ्यावी लागणारी काळजी .. व त्याचे काटेकोर पालन केल्यास यश आपल्या हातात असते..हे कळून येते..धन्यवाद..!

Leave a Reply

error: Content is protected !!