इगतपुरीनामा न्यूज, दि. 26 ( गौरव परदेशी, खेड भैरव )
खेड भैरव ता. इगतपुरी येथील जागृत देवस्थान असणाऱ्या श्री सिद्ध भैरवनाथ महाराजांची यात्रा आज सोमवारी चैत्र पौर्णिमेला होणार होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आदेशानुसार यात्रा रद्द करण्यात आली आहे. दरवर्षी भैरवनाथ महाराजांची यात्रा 2 दिवस चालते. यात्रेसाठी जिल्हाभरासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि प्रशासनाच्या आदेशानुसार गेल्या वर्षी प्रमाणेच यंदाही यात्रोत्सव व रथ मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. कोणत्याही भाविकांनी व व्यावसायिकांनी मंदिर परिसरात येऊ नये असे आवाहन येथील भैरवनाथ महाराज ट्रस्ट व खेड ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे. या आवाहनाला भाविकांकडून प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. दरवर्षी यात्रेत लाखो रुपयांची होणारी आर्थिक उलाढाल ठप्प होणार असल्याने याचा व्यावसायिकांना आर्थिक फटका बसणार आहे.
दरवर्षी येथील दोन दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवात जिल्हयातील तसेच परिसरातील भाविक हजेरी लावतात. मात्र मागील वर्षीप्रमाणेच कोरोनाच्या पार्श्वभूमिवर प्रशासनाच्या आदेशानुसार यात्रोत्सव रद्द करण्यात आला असून मंदिर परिसरात नागरिकांना येण्यास बंदी करण्यात आली आहे.
– रामदास वाजे, ट्रस्ट पदाधिकारी, खेड भैरव