
लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – जन्मत: दोन्ही डोळे नसल्याने जग पाहू न शकणाऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या नशीबी संघर्ष असतो. अशातच त्या व्यक्तींच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना दुसऱ्याचा आधार घ्यावा लागतो. याच प्रकारे हार न मानता मोगरे ता. इगतपुरी येथील दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या दीपक शिवराम गवारी हा ३० वर्षीय युवक सक्रिय आहे. त्याने शिक्षणाच्या बळावर विविध कला अवगत करीत स्वावलंबनाने जीवनाचा मार्ग सोपा केला आहे. दिपकचे प्राथमिक शिक्षण नाशिकरोडच्या शासकीय अंधशाळेत झाले. केटीएचएम महाविद्यालयात शिक्षण झालेल्या दीपकला गाणे ऐकणे, गाणे म्हणणे, ढोलकी व इतर काही वाद्य वाजवणे, क्रिकेट ऐकणे, क्रिकेट खेळणे असे विविध छंद आहेत. कुठेही जागरण गोंधळ असो वा कोणत्याही शाळेत समूहगीत कार्यक्रम असो अंध असूनही हार्मोनियम, ढोलकी आदी वाजवण्यासाठी दिपकला बोलवले जाते. दिपकला संगणक हाताळता येत असून त्याचा टेलिफोन कोर्स झालेला आहे. मराठी टायपिंग, इंग्लिश टायपिंग हे कोर्स सुद्धा पूर्ण झालेले आहेत. शिकवण्याचे संपूर्ण श्रेय आई कलाबाई शिवराम गवारी हिला जाते. आईच्या अथक परिश्रमामुळे मी शिकून खूप मोठा झालो. शिक्षणाचे फळ मला नक्कीच मिळाले आहेत असे दीपकने सांगितले. त्याने महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखरावर शंभर वेळेस, सप्तशृंगी गडावर चाळीस वेळा चढाई केलेली आहे. दीपक सध्या सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये कंत्राटी नोकरी करत आहे. दिपकच्या शिक्षणासाठी हातभार लावणारी आई कलाबाई शिवराम गवारे, दाजी रघुनाथ हरी सारुक्ते, बहीण आशाताई सारुक्ते यांची त्याला नेहमी मदत असते. आमच्यासारख्या अनेक दिव्यांग बांधवांनी संकटाला संधी मानून न डगमगता वाटचाल केल्यास यश नक्की मिळेल असे दीपकने सांगितले.