अवैधपणे गावठी दारू गाळणाऱ्या ३२ ठिकाणी एकाच वेळी छापे ; २५ गुन्हे, ८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत : इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर येथे सापडला सर्वाधिक माल

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांचे आदेशान्वये जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कारवाई सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दुर्गम भागात छुप्यारित्या सुरू असलेल्या गावठी दारू हातभट्ट्यांवर आज ग्रामीण पोलीस दलातर्फे धाडसत्राचे आयोजन करण्यात आले होते. आज ग्रामीण पोलीसांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी हातभट्टीच्या दारूची अवैधपणे गाळप करणाऱ्या ३२ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून सुमारे ८ लाख ९ हजार  रूपये किंमतीचे गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन, तयार गावठी दारू व इतर साधन सामुग्री जप्त करून २५ इसमांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याखाली २५ गुन्हे दाखल केले आहेत. सदर धाडसत्रात सर्वात जास्त माल घोटी पोलीस ठाणेच्या हद्दीतील मोराच्या डोंगराच्या पायथ्याशी उमराई माथा परिसरात मिळून आला. सदर ठिकाणी विशेष पथकाने छापा टाकून, त्याठिकाणाहून २०० लिटरचे ४७ प्लॅस्टिक ड्रम व त्यातील एकूण ९४०० लिटर नवसागर व गुळ मिश्रीत रसायन, काळया गुळाची पावडर असलेल्या १७ गोण्या, १४ गुळाच्या भेल्या, ५ किलो नवसागर असा एकूण ४ लाख ९२ हजार ६०० रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर कारवाईमुळे खैरगाव बीटचे बीट अधिकारी व अंमलदार यांना पोलीस मुख्यालयात संलग्न करण्यात आले आहे.

या धाडसत्रात जिल्ह्यातील मालेगाव तालुका, सटाणा व अभोणा मधील ४, इगतपुरी व जायखेडामधील प्रत्येकी ३, वाडीवऱ्हे मधील २, तर त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, कळवण, नांदगाव, घोटी मधील प्रत्येकी १ ठिकाणांचा समावेश आहे. यात जिल्हयातील डोंगर दऱ्या नदी-नाल्यांच्या लगत असलेल्या गावांमध्ये गावठी दारू हातभट्ट्यांवर छापे टाकून पोलीसांनी मोठ्या प्रमाणावर हातभट्टीची गावठी दारू नष्ट केली आहे. देवळा, सिन्नर, वणी, पेठ या पोलीस ठाणे हद्दीतील परंपरागत हातभट्टी गाळप करणाऱ्या ठिकाणांवर देखील छापे टाकण्यात आले, परंतु सदर ठिकाणी काहीही आढळून आले नाही. सदर कारवाईत अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांचेसह ५ पोलीस उपअधीक्षक, १५ पोलीस निरीक्षक, ३५ सहा. पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक व सुमारे ४०० पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला होता. जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसाय हद्दपार करण्यासाठी अशा व्यवसायांची माहिती पोलीसांपर्यंत पोहोचावी या दृष्टिकोनातून नाशिक ग्रामीण पोलीसांनी खबर हेल्पलाईन सुरू केली असून, नागरिकांनी 6262256363 या हेल्पलाईनवर संपर्क साधून आपल्या परिसरात चालणाऱ्या अवैध व्यवसायांची माहिती नाशिक ग्रामीण पोलीसांना द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!