
इगतपुरीनामा न्यूज – गुरुवारी अनंत चतुर्दशीला गणेश भक्तांनी वालदेवी धरणावर गणेश विसर्जनास जाऊ नये. यासाठी कोणीही गर्दी करू नये असे आवाहन वाडीवऱ्हेचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी केले आहे. वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याअंतर्गत पिंपळद हद्दीत वालदेवी धरणावर गणेश विसर्जन करण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. या ठिकाणी गणेश विसर्जन करण्यास ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय झाला आहे. येथे यापूर्वी अनेकदा दुर्दैवी दुर्घटना घडल्या असून अशा दुर्घटना पुन्हा घडू नये यामुळे नागरिकांनी विरोध केला आहे. पोलीस निरीक्षक समीर बारवकर, पोलीस नाईक प्रवीण काकड, विक्रम काकड, पोलीस पाटील बेझेकर, पिंपळद ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी धरण भागाची आज पाहणी केली. विसर्जनासाठी दरवर्षी नाशिक, पाथर्डी फाटा, सिडको, वाडीवऱ्हे, पिंपळद, विल्होळी या भागातील नागरीक गर्दी करत असतात. गणेश विसर्जनाच्या दिवशी नागरिकांनी खोल पाण्यात जाऊ नये. स्वतःच्या व इतरांच्या जीवितास धोका उत्पन्न होईल असे कृत्य करू नये असे आवाहन वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी केले आहे.