घोटी येथे नवरंग ग्रुपच्या वतीने मंगळागौर महोत्सवात शेकडो महिलांचा सहभाग

इगतपुरीनामा न्यूज – घोटी शहरात गौरी गणपती निमित्त नवरंग ग्रुपतर्फे मंगळागौर महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्रावणात आरोग्याच्या दृष्टीने तसेच शारीरिक सक्षमीकरणासाठी महिलासांठी विविध खेळ खेळले जातात. यासाठी घोटी शहरात नवरंग ग्रुपच्या वतीने  मंगळागौर महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवात घोटी शहरातून शेकडो महिलांनी सहभाग घेतला होता. ग्रामीण भागात खेळ दुर्मिळ होत चालले असून, आपली संस्कृती जोपासण्यासाठी हा महोत्सव घेण्यात आला असल्याचे आयोजकांनी  व्यक्त केले. यात विविध स्पर्धांच्या माध्यमातून मंगळागौर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पिंगा, दंड फुगडी, एक हाताची फुगडी, कमळ फुगडी, सासू – सुनेची आराधारी, सूप कळशी, करवंटी खेळ, तर संगीत खुर्ची, लंगडी, चमचा लिंबू, तळ्यात – मळ्यात  ह्या स्पर्धा घेण्यात आल्यात. त्यात विविध स्पर्धांच्या माध्यमातून पारितोषिके ठेवण्यात आली होती. संगीत खुर्ची स्पर्धेत प्रथम द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. यामध्ये परितोषिकांमध्ये पैठणी साडी व ट्रॉफी बक्षीस स्वरूपात देण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर मंगळागौर महोत्सवाचे आयोजक गौतमी संदीप किर्वे, रत्ना विठ्ठल काळे, सृतिका कैलाश जोरावर, विनिता योगेश काळे, स्वाती सोपान काळे, सुवर्णा दीपक किर्वे, अश्विनी सतीश वालझाडे, वैशाली मंगेश किर्वे, कल्याणी मयूर वालझाडे, रोशनी बाळा आडोळे आदी उपस्थित होते. मंगळागौर स्पर्धेचे आयोजन केल्याने महिलांमध्ये हर्षोउल्हासाचे वातावरण होते.

Similar Posts

error: Content is protected !!