अंजनेरी येथील हनुमान जयंती उत्सव रद्द

इगतपुरीनामा न्यूज, दि. 23 ( ज्ञानेश्वर महाले, त्र्यंबकेश्वर )

येत्या मंगळवारी ( दि.२७ ) रोजी हनुमान जन्मस्थान असलेली अंजनेरी येथील हनुमान जयंती उत्सव रद्द करण्यात आला आहे. यावर्षी ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा उत्सव रद्द करण्यात आला असल्याची माहीती अंजनेरीच्या सरपंच पुष्पा बदादे, उपसरपंच गणेश चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. यात्रा काळात उद्या शनिवारपासुन अंजनेरी गडावर जाण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे कोणीही भाविकांनी अंजनेरी गडावर न येण्याचे विनंती करण्यात आली आहे.

अंजनेरी येथे हनुमान जयंती यात्रेला अनेक वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी येथे हजारो भाविक येतात. सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत. भाविकांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी सलग दुसऱ्या वर्षी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  याबाबतचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन अंजनेरी येथील उपसरपंच गणेश चव्हाण यांनी केले आहे.

वाढोली, बेझे येथील यात्रा उत्सव यंदा नाही

बेझे येथे हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी होणारी बेझे येथील शिलाईमाता व वाढोली येथील भैरवनाथ यात्रा उत्सव कोरोना पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. अंजनेरी, बेझे, वाढोली या गावात रविवारपासुन बुधवारपर्यंत कोणी मंदिर परिसरात न जमण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.