
इगतपुरीनामा न्यूज – राज्यातील बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पदवी, पदविका पूर्ण केलेल्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्या सर्वांना रोजगार देणे शक्य नाही. बेरोजगारांना दिलासा देण्यासाठी देशातील अनेक राज्यांनी बेरोजगार भत्ता सुरु केला आहे. राजस्थान, छत्तीसगड मध्ये बेरोजगार तरुण-तरुणींना बेरोजगार भत्ता दिला जातो. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही सरकारने बेरोजगारांना बेरोजगार भत्ता द्यावा, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी विधानपरिषदेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत केली.
आ. तांबे म्हणाले, सरकारने सर्वसामान्य नागरिक, शेतकऱ्यांसाठी राज्याची तिजोरी खुली करण्याची गरज आहे. बागलाण तालुक्यातील सटाणा येथे १८७०-७१ मध्ये पडलेल्या दुष्काळात तत्कालीन मामलेदार यांनी सरकारचे १ लाख २७ हजार रुपये शेतकऱ्यांमध्ये वाटले. ब्रिटीश अधिकान्यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तपास केला, तेव्हा तिजोरीत पैसे सापडले. याला एखाद्या चमत्काराप्रमाणे समजले गेले व त्यांना देव मामलेदार संबोधले जावू लागले. देव मामलेदार यांनी सर्वसामान्य नागरिक, शेतकरी यांच्या समस्या सोडवण्यासाठी निर्णय घेतला होता. सरकारनेही सामान्य माणसाला न्याय देण्याची गरज आ. तांबे यांनी व्यक्त केली.