सतत रामकृष्णहरी मंत्राचा उच्चार करणारा कट्टर वारकरी हरपला : संस्कारक्षम पिढी घडविणारे पहिलवान वै. एकनाथ यशवंत सहाणे

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील साकुर येथील नावाजलेले पहिलवान  वै. एकनाथ सहाणे यांच्या वयाच्या ८८ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. वै. एकनाथ सहाणे यांनी अत्यंत गरीब परिस्थितीवर मात करीत कुस्ती क्षेत्र व वारकरी सांप्रदायात नावलौकिक मिळवलेला आहे. त्यांनी खाजगी कंपनीची ३० वर्षे नोकरी सांभाळून मुलांना वारकरी शिक्षणाचे बाळकडू देत संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी मोठे कष्ट घेतले. १९६१ मध्ये महाराष्ट्रात कुस्तीगीर चॅम्पियन होण्याचा मान पटकावला आहे. सतत १० वर्षे कुस्ती क्षेत्रात प्रतिनिधित्व केले. पहिलवान म्हणून त्यांनी मोठी कामगिरी केलेली आहे. याबरोबरच बाबांनी  वारकरी पंथाचे व्रत अंगिकारून ठाणे जिल्ह्यात भजनी मंडळाची स्थापना केली होती. प्रत्येक वाक्यानंतर रामकृष्णहरी मंत्राचा उच्चार करणारे वै. एकनाथ सहाणे यांच्या निधनाने वारकऱ्यांमध्ये दुःख पसरले आहे.

बेलगाव कुऱ्हेचे वै. रुंजाबाबा गुळवे आणि सहकाऱ्यांच्या मदतीने पारसीवाडी ठाणे येथील विठ्ठल मंदिरात संत मालिका पठण करून काकडा भजनाने परमेश्वराचे नामस्मरण करून वारकरी सांप्रदायिक कार्य जोपासले. साकुरभूषण हभप पंढरीनाथ महाराज सहाणे, तानाजी सहाणे व दोन मुलींवर योग्य संस्कार केल्यामुळे पंढरीनाथ महाराज सहाणे वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून बालकांना वारकरी शिक्षण देऊन सामाजिक कार्य करीत असतात. वै. एकनाथ सहाणे यांचे गुरू मोतीराम महाराज भगूरकर यांच्या प्रेरणेने हभप नागोराव बहाद्दूरे यांच्या सानिध्यात राहून वारकरी सांप्रदयाचे कार्य केले. कोंडाजी मामा डेरे यांची भजनी मालिका संपूर्ण पाठांतर करून साकुर गावात सर्वात प्रथम काकडा भजनाला प्रारंभ केला. पंचक्रोशीत हरिनाम सप्ताहात नित्यनियमाने काकडा भजन केले. मठाधिपती माधव महाराज घुले यांच्या मठात नित्यनियमाने  हरिपाठ, काकडा भजन करीत असत. नावाजलेले पहिलवान एकनाथ सहाणे यांनी ३१ वर्षे आळंदी ते पंढरपूर पायी वारी केली आहे.

Similar Posts

error: Content is protected !!