
इगतपुरीनामा न्यूज, दि. 22
नाशिक जिल्हयातील वाढता कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शासन तसेच जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून रूग्णांच्या वाढत्या संख्येपुढे साधनसामग्री कमी पडत आहेत. साधनसामग्री उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च होत असून निधी कमी पडत आहे. या परिस्थितीचा सारासार विचार करून जिल्हयातील मंदिर संस्थांनी आर्थिक मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे. असे स्पष्ट करत मंदिर संस्थांनी कोरोनाच्या उपाययोजनांसाठी आर्थिक मदत करावी या मागणीचे निवेदन आज खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिक विभागाचे धर्मादाय सहआयुक्त यांना दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने जिल्ह्यात थैमान घातले आहे. आजमितीस सुमारे 60 हजार रूग्ण जिल्हयातील विविध रूग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. रुग्णांची संख्या प्रचंड वाढल्याने बेद, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड मोठ्या प्रमाणावर कमी पडत आहे. यामुळे रुग्णांची हेळसांड होत असून रूग्णांच्या नातेवाईकांची कुचंबणा होत आहे. रुग्णांना दिलासा देण्यासाठी शासन आणि जिल्हा प्रशासन विविध ठिकाणी कोविड सेंटर उभारण्याचे काम जोमाने करत असले तरी साधनसामग्री कमी पडत आहे. कोरोनाच्या उपाययोजनांपोटी लागणाऱ्या अत्यावश्यक साधनसामग्रीसाठी मंदिर संस्थांनी मदतीसाठी पुढे येण्याची गरज असल्याचे खासदार गोडसे यांनी नाशिक विभागाच्या धर्मादाय सहआयुक्त यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. सामाजिक जाणिवेतून कोरोनाच्या साधनसामग्रीसाठी मंदिर संस्थांनी आपल्याकडील उपलब्ध निधीतून काही रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द करण्याकामी आपण मंदिर संस्थांना आवाहन करण्याची आग्रही मागणी यावेळी खासदार गोडसे यांनी नाशिक विभागाचे धर्मादाय सहआयुक्त जयसिंग झपाटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.