वृद्धाश्रमासह इगतपुरी तालुक्यात गोरख बोडके यांचा वाढदिवस धूमधडाक्यात संपन्न
इगतपुरीनामा न्यूज – आईवडिलांच्या पुण्याईमुळे जन्म मिळाला असल्याने ईश्वरस्वरूप जनता जनार्दनाची सेवा करता येत आहे. त्यानुसार रोटरी क्लबचे अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त इगतपुरी तालुक्यातील बिटूर्ली येथील आगग्रस्त पीडित कुटुंबातील भाऊ बुधा पारधी यांच्या नवीन घराचे भूमिपूजन केले. मागील महिन्यात आगीमुळे भाऊ पारधी यांचे संपूर्ण घर भस्मसात झाले होते. आज गोरख बोडके यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त रोटरीकडून त्यांना घराची भेट देत कामाला प्रारंभ केला. घराचे बांधकाम स्लॅबचे होणार असून विजेची कटकट दूर करण्यासाठी त्या घरावर सौर ऊर्जा पॅनल लावण्यात येणार आहे. येत्या ४ महिन्यात घराचे काम पूर्ण होणार आहे. पारधी कुटुंबातील महिलेच्या हातून केक कापून गोरख बोडके यांना शुभेच्छा देण्यात आल्या. इगतपुरी तालुक्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या गोरख बोडके यांनी रोटरीमार्फत घर दिल्याबद्दल पारधी कुटुंबाने ऋण व्यक्त केले. आजच्या वाढदिवसाच्या पर्वावर इगतपुरी तालुक्यासह नाशिक शहरात विविध लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात आले. सकाळपासून संपूर्ण तालुक्यातील विविध पदाधिकारी आणि नागरिकांनी शुभेच्छा देण्यासाठी त्यांची भेट घेतली. ( बातमी पुढे वाचा )
मानवधन वृद्धाश्रमातील वयोवृद्ध नागरिकांसाठी गोरख बोडके यांच्याकडून मनमुराद सुग्रास भोजनाचा आस्वाद देण्यात आला. यासह विविध फळांचे वाटप करून गोरख बोडके यांनी जेष्ठ नागरिकांचे आशिर्वाद घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. जेष्ठ नागरिकांनी भरभरून आशीर्वादाचे दान गोरख बोडके यांना देऊन उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. मानवधन शिक्षण संस्थेतील अंगणवाडी केंद्रातील बालकांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप यावेळी स्वतंत्रपणे करण्यात आले. रोटरीच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्व जपण्यासाठी हे उपक्रम राबवले असल्याचे यावेळी गोरख बोडके यांनी सांगितले. आदर्श गाव मोडाळे येथील पायपीट करीन शाळेत शिकणाऱ्या प्रतिकूल परिस्थिती असणाऱ्या कुटुंबातील १०० मुलींना सायकली वाटपाचा कार्यक्रम प्रतिनिधिक स्वरूपात संपन्न झाला. यासाठी गोरख बोडके यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून रिलायन्स फाउंडेशनने यासाठी सहाय्य दिले आहे. गरीब कुटुंबातील महिलांचे जीवन सुसह्य करण्यासाठी एका सामाजिक संस्थेमार्फत ७०० महिलांसाठी निर्धुर चुली वाटपाचा कार्यक्रम वाढदिवसाच्या निमित्ताने संपन्न झाला. ह्या आठवड्यात सर्व लाभार्थ्यांना सायकली आणि चुली वाटप करण्यात येणार आहेत.