इगतपुरीनामा न्यूज, दि. 21 ( किशोर देहाडे, इगतपुरी )
इगतपुरी स्थानक मध्य रेल्वेचे अत्यंत महत्त्वाचे स्थानक असून जवळच कसारा घाट आहे. त्यामुळे इगतपुरी स्थानकावर अतिरिक्त इंजिने गाडीपासून वेगळे करून पुन्हा कसारा येथे पाठविण्यात येतात. याचाच फायदा इगतपुरी कसाऱ्यातील फुकटे प्रवासी घेतांना दिसून येत आहेत. त्यातच ते जीवघेणा इंजिनला लटकून प्रवास करीत असल्याने रेल्वे सुरक्षा दल कुठं आहे ? असा सवाल उपस्थित होतोय.
रेल्वेच्या नियमांनुसार रेल्वे संबंधित कर्मचाऱ्यांशिवाय अन्य कोणीही वैध तिकीटा शिवाय प्रवेश करु शकत नाही. तरीही कसारा इगतपुरीचे नागरिक बिनधास्त पणे रेल्वेच्या हद्दीत प्रवेश करतात. गाडीपासून वेगळे केलेले इंजिन पुन्हा कसाऱ्याकडे जाण्यासाठी निघते तेव्हा हे फुकटे प्रवासी इंजिन चालक ( लोको पायलट ) यांची नजर चुकवून थेट इंजिन मध्ये प्रवेश करतात. वास्तविक बघता रेल्वे इंजिन हे मेल-एक्सप्रेसचा कणा आहे. यामुळे इंजिनमध्ये चालकाशिवाय इतर कोणालाही प्रवेश करता येत नाही. तरीही बाहेरील व्यक्ती थेट आतमध्ये प्रवेश करतोच कसा ? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. या फुकट्या प्रवाशांमध्ये अशिक्षित महिलांचा भरणा मोठ्या प्रमाणात आहे. काही महिला व पुरुष इंजिनला बाहेरुन लटकत किंवा दोन्ही इंजिनच्या मध्ये व्हॅक्यूम पाईपला पकडून जीव धोक्यात घालून बिनधास्त प्रवास करताना निदर्शनास येत आहे. आपला स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्यांमुळे रेल्वेच्या सेवेलाही बाधा निर्माण होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. रेल्वेचे इंजिन अति वेगाने धावत असते. इंजिनमध्ये ब्रेक व इतर संवेदनशील अतिमहत्त्वाचे पार्ट असतात जर यदाकदाचित अशा अशिक्षित फुकट्या प्रवाशांकडून चुकून काही झाले तर मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हा सर्व प्रकार रेल्वेच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांच्या समोर बिनदिक्कत घडतो. तरी सुद्धा हे जवान डोळेझाक करतात असल्याचे सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे. रेल्वे सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. रेल्वे इंजिन मध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करणाऱ्या तसेच बाहेर लटकून धोकादायक प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर रेल्वेच्या नियमांनुसार विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात यावे. जेणेकरून रेल्वेला बाधा निर्माण होणार नाही व फुकट्या प्रवाशांवर आळा बसेल असे सुज्ञ नागरिक व काही रेल्वेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये बोलले जात आहे