

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील विविध आदिवासी वाड्यापाड्यांमध्ये मोठ्या धूमधडाक्यात अक्षयतृतीया सण साजरा झाला. महिला, युवती, बालिका आणि कुटुंबातील सर्व सदस्यांनी पारंपरिक आदिवासी वेशभूषा केल्या. आदिवासी संस्कृतीच्या रीतीरिवाजाप्रमाणे हा सण संपन्न झाला. धामडकीवाडी येथे आखजा सण सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. बोर्ली वाघ्याचीवाडी येथेही ग्रामस्थांनी आखजा सणाचा आनंद लुटला. बोर्लीचे उपसरपंच गोविंद भले आणि बबन आगिवले या सणाबद्धल अधिक माहिती दिली. सणाच्या सात दिवस लहान टोपलीमध्ये माती घेऊन त्यात पाच प्रकारचे धान्य पेरले जाते. यात भात, नागली, मका, तूर, उडीद इत्यादी धान्यांचा समावेश केला जातो. धान्य पेरलेल्या टोपलीला “गौर” किंवा “गौराई” असे म्हणतात. नंतर पेरलेल्या धान्याला पाणी शिंपडतात. या गौराईला सूर्यप्रकाश व हवा न लागो म्हणून घरातील एका कोपऱ्यात मोठ्या टोपली खाली झाकले जाते. म्हणजे रोप हिरवी न होता, पिवळ्या रंगाची होतात. पुढील सात दिवस गौराईला सकाळ-संध्याकाळ पाणी घातले जाते. या दरम्यान रात्रीच्या वेळी महिला “गौराईची गाणी” म्हणतात. सणाच्या दिवसी मिरवणूक काढण्यात येते. महिला आपआपल्या घरी उगवलेल्या गौराईला कागदी गजरा लावून सजवतात. नैवद्य दाखवून पूजा करतात, नंतर गौराईला उचलून डोक्यावर घेऊन घराबाहेर येतात. सतत झाकूण ठेवल्यामूळे रोपाला ‘पिवळा रंग’ प्राप्त झालेला दिसतो. वाडीतील मोकळ्या जागेत संपुर्ण गावातील महिला गौराईला घेऊन एकत्र येतात. मोकळ्या जागेत गौराई खाली ठेवून तिच्या भोवती गोल रिंगण धरुन ‘टिपरी’ घेऊन गौराईची गाणी म्हणत नाचतात. नंतर पारंपारिक वाद्य “संबळ” ( सांबळ्या, कहाळी ) यांच्यासंगे नाचत-नाचत मिरवणूक पूढे चालते. गौराईला गावाजवळील नदी, तलाव किंवा विहिरीवर नेतात. तिथे पूजा करून उगवलेली गौर ( पिवळी रोप ) तोडून घेतात व खालील माती- मूळांचा भाग पाण्यात विसर्जन करतात. तोडलेली गौर थोडीशी देवाला अर्पण करुण बाकीची उरलेली महिला आपल्या केसात माळतात. या सणासाठी नवविवाहीत मुली सासरहून माहेरी येत असतात. हा सण शेवटचा असल्यामूळे या सणाला “बुडीत सण” असेही म्हणतात.

