पाण्यातून जीवनरक्षा करणाऱ्या जीवनरक्षकांना मानधन द्या : राष्ट्रपती पुरस्कार विजेते जीवरक्षक गोविंद तुपे मुख्यमंत्र्यांकडे मांडणार व्यथा

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १३ – वयाच्या १६ वर्षापासून आतापर्यंत नदीत बुडणाऱ्या व्यक्तींचे प्राण वाचविण्याचे महत्वपूर्ण काम बेलू येथील राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त गोविंद तुपे करतात. पदरमोड आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून जीवनरक्षकाचे काम ते करीत आहेत. नदी, विहीर, धरणातून बुडालेल्यांना आणि मृतदेहांना बाहेर काढण्याचे अवघड काम करण्यात त्यांचा हातखंडा आहे. याकामासाठी शासनाकडून मात्र कोणतेच मानधन मिळत नसल्याने ते हतबल झाले आहेत. उत्तम जीवन रक्षा पुरस्कार प्राप्त जीवरक्षकांना शासनाकडून मानधनाची तरतूद करण्यात यावी या मागणीसाठी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन व्यथा मांडणार आहेत. आतापर्यंत अडीच हजारापेक्षा अधिक मृतदेह त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून पाण्यातून काढले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपती उत्तम जीवन रक्षा पुरस्कार मिळालेला आहे.

बुडालेले मृतदेह काढण्यासाठी गोविंद तुपे अनेक ठिकाणी सामाजिक भावनेतून जातात. बुडालेल्या व्यक्तींचे जीव वाचवण्यासाठी अथवा बुडालेल्याचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी जीवरक्षक गोविंद तुपे हे कुणाकडेही पैशाची मागणी करीत नाही. घटनास्थळी पोहचण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात. अक्षरशः पत्नीचे दागिने गहाण ठेऊन व शेतीच्या तुटपुंज्या उत्पनातून त्यांनी महामार्ग अपघातात ३०० व्यक्तींचे प्राण वाचवले असून खोलवर पाण्यातून अडीच हजार मृतदेह बाहेर काढले आहेत. बुडालेले मृतदेहाच्या अंगावर असलेले दागिने प्रामाणिकपणे नातेवाईकांना देऊन टाकतात. शासनाने दखल घेऊन मानधन सुरू केल्यास मदत मिळेल असे गोविंद तुपे यांनी सांगितले.

Similar Posts

error: Content is protected !!