इगतपुरीनामा न्यूज, दि. 18 ( निलेश काळे )
इगतपुरी तालुक्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून घोटीकडे बघितले जाते. घोटीमध्ये इगतपुरी तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातून तसेच राजूर-भंडारदरा भागातून नागरिक बाजारपेठेत येत असतात. वाढत्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ‘ब्रेक द चैन’ अंतर्गत जीवनावश्यक वस्तूचे दुकाने सुरू ठेवले असल्याने निम्मी बाजारपेठ बंद आहे. ऐन लग्नसराई आणि सणांच्या दिवसांत कपड्यांचे दुकाने बंद असल्याने व्यापारी हवालदिल झाले आहेत. प्रत्येक दुकानांमध्ये साधारण एक-दोन कामगार असल्याने त्यांच्यावर देखील उपासमारीची वेळ आली आहे.
गेल्या काही दिवसांत विवाह मुहूर्त नसल्याने एप्रिल महिन्यात साधारण २२ एप्रिलपासून विवाह मुहूर्त आहेत. लग्न तोंडावर आले त्यात कपड्यांची दुकाने बंद झाल्याने संयोजकांची पुरती दमछाक झाली आहे. गतवर्षी ह्याच वेळेस लॉकडाऊन झाल्याने गोडाऊनमध्ये माल पडून होता. यंदाही काहीशी तशीच स्थिती आहे. पुढच्या हंगामाचा माल दोन चार महिने आधीच बुक करावा लागत असतो. माल व्यापाऱ्यांकडे आला आणि दुकाने बंद झाल्याने व्यपाऱ्यांकडून काहीसा नाराजगीचा सूर उमटतो आहे. लग्न सराईत बस्ते, मानपान आदी कारणांनी दुकानदारांचे सुगीचे दिवस असतात मात्र निर्बंध किती दिवस राहतात तसेच जीएसटी, वीजबिल,दुकानांचे भाडे कसे देय करायचे याचा पेच दुकांदारांसमोर पडला आहे.
लग्नसराईसाठी लागणारे बस्त्याचे व मानपान जानेवरीतच मागवल्याने ऐन लग्नसराईच्या तोंडावर दुकाने बंद करावी लागल्याने भांडवल देखील अडकून गेले आहे.निर्बंधांचा दिवस वाढल्यास दुकानाचे बिल, वीजबिल भरायचे कसे? हा मोठा पेच पडला आहे.
– प्रियंका कदम, संचालक, हरी ओम कलेक्शन, घोटी