१३ वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांना लागली जिल्हा परिषद शाळेची ओढ : घोटी येथे माजी विद्यार्थी आणि शिक्षकांचे स्नेहसंमेलन उत्साहात

इगतपुरीनामा न्यूज, दि. १२ – घोटी येथील रामरावनगर जिल्हा परिषद शाळेचा पहिला माजी विद्यार्थी आणि शिक्षकांचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. शाळेच्या स्थापनेनंतर प्रथमच जिल्हा परिषद शाळेची ओढ माजी विद्यार्थ्यांना लागल्याची ही घटना आहे. २०१० मध्ये इयत्ता ७ वी वर्गात शिकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. तब्बल १३ वर्षांनी या वर्गातील सर्व मुले मुली, शिक्षक एकमेकांना भेटले. आठवणी सांगत सर्वांनी एकमेकांशी आपले सुख दुःख आणि प्रगतीच्या गप्पा रंगवल्या. सूत्रसंचालन माजी विद्यार्थी मेघा रोकडे, शशिकांत तोकडे यांनी केले. निवृत्त मुख्याध्यापिका विजया देवरे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. निवृत्त शिक्षक कृष्णा खंबाईत, मिलिंद खादे, रामदास लोहरे, शंकर पेढेकर, भास्कर राक्षे, घोडे सर, कल्याणी पाटोळे, जयश्री थोरात, सुजाता बोरसे, प्रतिभा साबळे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमात मराठी शाळांच्या परिस्थितीत सुधारणा करून त्यांना आवश्यक सुविधा मिळायला हव्या याविषयी चर्चा झाली. शिष्यवृत्ती परीक्षेबाबत नियोजन करण्यासाठी चर्चेत सर्वांनी भाग घेतला. झाले. यापूर्वी शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षेबरोबर पूरक ज्ञान मिळत होते मात्र सध्याचे विद्यार्थी मोबाईलच्या आहारी जात आहे.  जिल्हा परिषद शाळेत सर्व शालेय साहित्य मोफत मिळत असूनही पालकांचा कल हा इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे जास्त पहायला मिळतो अशी खंत निवृत्त शिक्षकांनी व्यक्त केली. आलेल्या सर्व पाहुण्यांचा सत्कार करून त्यांचे स्वागत सर्व माजी विद्यार्थ्यांनी केले. याप्रसंगी अनेकांनी मनोगत व्यक्त करून शाळेच्या आठवणी जागवल्या. मनोगत व्यक्त करतांना अनेकांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. सर्व आठवणींना उजाळा देत पुन्हा भेटण्याचा शब्द देऊन कार्यक्रमांची सांगता झाली.

Similar Posts

error: Content is protected !!